अहिल्यानगरमध्ये बारावीच्या परीक्षेसाठी गेलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या अचानक बेपत्ततेने खळबळ उडाली आहे. मुलगी परीक्षा केंद्रावर गेली पण पेपर संपल्यानंतर ती बाहेर आलीच नाही. नातेवाईकांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर, मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
गुरुवारी सकाळी १७ वर्षीय मुलगी बारावीच्या पेपरसाठी नगर शहरातील एका महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी गेली. परीक्षेच्या वेळेत सर्व काही व्यवस्थित होते. मात्र, पेपर संपल्यानंतर इतर विद्यार्थी बाहेर आले, पण ती मात्र परीक्षा केंद्रातून बाहेरच आली नाही.

नातेवाईकांनी परीक्षेसाठी आलेल्या इतर विद्यार्थ्यांकडे चौकशी केली, मैत्रिणींनाही विचारले, पण कोणीही तिच्याबाबत काही सांगू शकले नाही. संपूर्ण परिसरात शोध घेऊनही तिचा पत्ता लागला नाही, त्यामुळे नातेवाईकांनी तातडीने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पळवून नेण्याचा संशय ?
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. विद्यार्थिनीला पळवून नेण्यात आले असावे, असा संशय पोलिसांना आहे. सध्या परीक्षेच्या हंगामात अशा घटना वाढत असल्याने, ही मुलगी स्वतः कुठे गेली की तिला जबरदस्ती पळवून नेण्यात आले, याचा शोध घेतला जात आहे.
पोलीस अधिकारी परीक्षा केंद्राच्या CCTV फुटेजची तपासणी करत आहेत, तसेच विद्यार्थिनीच्या फोन लोकेशनचा माग घेत आहेत. या घटनेने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.