उन्हाळ्याच्या दिवसांत लोकल किंवा रस्त्याच्या कडेला मिळणारे स्वस्त गॉगल्स मोठ्या प्रमाणात विकले जातात. फक्त १००-१५० रुपयांमध्ये उपलब्ध असणारे हे गॉगल्स फॅशनेबल आणि कुल लुक देतात म्हणून अनेक तरुण मंडळी ते आवडीने घेतात. मात्र, याच गॉगल्समुळे तुमच्या डोळ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, याची किती जणांना कल्पना आहे ?
उष्ण हवामान आणि डोळ्यांच्या समस्या
अहिल्यानगर जिल्हा तापमानाच्या बाबतीत उष्ण जिल्हा म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात सूर्याची तीव्रता जास्त असल्याने प्रखर सूर्यप्रकाश आणि धुळीमुळे डोळ्यांवर सतत ताण येतो. यामुळे डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा आणि डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत गॉगल घालणे अत्यावश्यक ठरते, परंतु योग्य दर्जाचे गॉगलच डोळ्यांना आवश्यक ते संरक्षण देऊ शकतात.

स्वस्त गॉगलमध्ये कोणते धोके?
अप्रमाणित फायबर आणि काचेचा वापर,लोकल गॉगल्समध्ये चांगल्या प्रतीच्या काचेऐवजी हलक्या दर्जाच्या फायबरचा वापर केला जातो. हे फायबर नजरेला सूक्ष्म प्रमाणात इजा करते, ज्यामुळे काही काळानंतर दृष्टी कमी होऊ शकते किंवा डोळ्यांना नंबरचा चष्मा लागण्याची शक्यता वाढते.
डोळ्यांवर ताण आणि डोकेदुखी
चुकीच्या गॉगलमुळे दृष्टी स्पष्ट राहात नाही, रस्त्यांचा अचूक अंदाज घेता येत नाही, आणि डोळ्यांवर अनावश्यक ताण येतो.यामुळे काही काळानंतर डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ आणि थकवा जाणवतो.
गॉगल खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ?
१) ब्रँडेड आणि प्रमाणित गॉगल्स निवडा – जे UV संरक्षण देणारे असतील.
२) नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या – डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणता गॉगल योग्य आहे हे डॉक्टर सांगू शकतात.
३) पोलराईझड गॉगल्स निवडा – ज्यामुळे प्रकाशाचा त्रास होत नाही आणि ड्रायव्हिंग सुरक्षित होते.
४) चुकीच्या गॉगल्सचा वापर टाळा – खासकरून वाहन चालवताना चुकीच्या गॉगल्सचा उपयोग टाळावा.
डोळ्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला
“डोळ्यांसाठी योग्य गॉगल निवडणे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा फुटपाथवरील गॉगल घेतला जातो, पण तो डोळ्यांसाठी अपायकारक असतो.त्यामुळे कोणताही गॉगल वापरण्यापूर्वी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे,” असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
योग्य गॉगल वापरा, डोळ्यांचे आरोग्य वाचवा!
फॅशनच्या नादात स्वस्त आणि अनब्रँडेड गॉगल्स घेणे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. त्यामुळे योग्य दर्जाचे, UV संरक्षण असलेले आणि डोळ्यांसाठी सुरक्षित गॉगल्स निवडणे हा एकच पर्याय आहे. डोळे शरीराचा महत्त्वाचा भाग आहेत – त्यामुळे त्यांची योग्य काळजी घ्या आणि फक्त फॅशनेबल दिसण्यापेक्षा डोळ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य द्या!