१ मार्च २०२५ टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील एसटी महामंडळ डेपोसाठी नविन एसटी बसेस मिळाव्यात तसेच वडगाव सावताळ व वासुंदे या गावांचा वीज प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी या परीसरात नविन वीज उपकेंद्र सुरु करावे अशी मागणी मा. जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
पारनेरमधील परिवहन महामंडळ डेपोमध्ये ६५ बसेस कार्यरत होत्या. पंरतु, कालांतराने या गाड्यांचे प्रमाण कमी करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत केवळ ४५ बसेस कार्यरत असून त्यातील ९ ते१० बसेस येत्या ३१ मार्च अखेर स्क्रॅपमध्ये जाणार आहेत. पारनेरच्या एसटी डेपो मध्ये २५ बसेस कमी असल्याने तसेच नियमित गाडयांच्या वेळेमध्ये बदल केल्याने शाळा तसेच महाविद्यालयीन विदयार्थ्यांचे तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे, तरी याबाबत विभाग नियंत्रक, रा. प. म. मं. अ. नगर यांना उचित निर्देश देऊन डेपोसाठी नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली.

तसेच पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ, वासुंदे ही दोन्ही गावे भौगोलिकदृष्टया मोठी असल्याने दोन्ही गावांत विजेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे.सदर दोन्ही गावे मध्यवर्ती ठिकाणी आहेत जर याठिकाणी वीज उपकेंद्र दिल्यास दोन्ही गावांसह परिसरातील अनेक गावांचा विजेचा प्रश्न सुटण्यास मदत होईल याबाबतीत ऊर्जा विभागाकडून वडगाव सावताळ, वासुंदे येथे सबस्टेशन मंजुर करण्यात यावे अशी मागणी सुजित झावरे पाटील यांनी केली. याबाबत उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले आहे.