IIT Baba : प्रयागराज महाकुंभातून प्रसिद्ध झालेले आयआयटी बाबा उर्फ अभय सिंग पुन्हा चर्चेत आले आहेत. नोएडामध्ये एका खाजगी न्यूज चॅनेलच्या चर्चा कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोशल मीडियावर हा वादाच्या गोंधळाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शुक्रवारी नोएडातील एका खाजगी न्यूज चॅनेलवर वादविवाद सत्र सुरू असताना अचानक वादाची ठिणगी पडली. आयआयटी बाबा यांनी आरोप केला आहे की चर्चेच्या दरम्यान काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्याशी गैरवर्तन केले. सेक्टर-126 पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही आणि सर्व बाजू तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

बाबा यांनी सांगितले की त्यांना न्यूज चॅनेलकडून चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले होते, मात्र, चर्चेदरम्यान काही अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी कसेबसे स्वतःला तिथून वाचवले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या मते, या संपूर्ण प्रकरणात बाबांची भूमिका काय आहे हे देखील तपासले जात आहे आणि त्यांनी स्वतः तक्रार मागे घेण्याचा विचार केला आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, या घटनेनंतर आयआयटी बाबा यांनी नोएडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर काही वेळ त्यांनी पोलिस ठाण्यासमोर निषेध नोंदवला, मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने त्यांनी निदर्शने मागे घेतली. सेक्टर 126 चे पोलिस अधिकारी भूपेंद्र सिंग यांनी सांगितले की बाबा यांनी कोणतीही पुढील तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
आयआयटी बाबा हे एरोस्पेस इंजिनिअरिंगमधून आध्यात्मिकतेकडे वळलेले व्यक्तिमत्त्व आहे. प्रयागराज महाकुंभ दरम्यान ते मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले. आयआयटी बॉम्बे येथून शिक्षण घेतलेल्या अभय सिंग यांनी आध्यात्मिक मार्ग स्वीकारला. त्यांनी स्वतःला श्री पंचदशनाम जुना आखाड्याचा सदस्य असल्याचे सांगितले होते, मात्र महंत नारायण गिरी यांनी त्यांचा आखाड्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या वादावर आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही संपूर्ण घटना आणि त्याचा व्हायरल व्हिडिओ पाहता, नोएडामधील हा वादविवाद कार्यक्रम खरोखरच चर्चेचा विषय ठरला आहे. हा प्रकार का आणि कसा घडला याबाबत अजूनही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही, त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.