Mumbai Vande Bharat Railway : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. मुंबईहून धावणाऱ्या एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेसला अतिरिक्त थांबा मंजूर करण्याचा निर्णय झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन.
ही ट्रेन सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर सध्या राज्यातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. आतापर्यंत महाराष्ट्राला 11 वंदे भारत ट्रेनची भेट मिळालेली असून आगामी काळात ही संख्या आणखी वाढणार आहे.
महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते सोलापूर, पुणे ते कोल्हापूर पुणे ते हुबळी नागपूर ते बिलासपूर नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
दरम्यान यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान सुरू असणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक नवीन अपडेट हाती आले आहे. या गाडीला अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे.
कुठं मिळणार थांबा ?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई सेंट्रल ते गांधीनगर या मार्गावर धावणारी वंदे भारत ट्रेन आता आनंद येथे सुद्धा थांबणार आहे. आनंद लोकसभा मतदारसंघाचे खासदार मितेश पाटील यांनी आनंद येथे या गाडीला थांबा मंजूर झाला असल्याची माहिती दिली आहे.
खासदार पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच या गाडीला आनंद येथे थांबा मिळाला असून या निर्णयामुळे आनंद व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
याबाबत खासदार महोदयांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे. आनंदचे खासदार म्हणाले की, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे प्रभावी सादरीकरण केल्यानंतर, रेल्वे मंत्रालयाने आनंद रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनच्या थांब्याला मंजुरी दिली आहे.
खरे तर सध्या ही गाडी या मार्गावरील अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वापी, आणि बोरीवली या स्थानकांवर थांबते. दरम्यान येत्या काळात ही गाडी आनंद येथे सुद्धा थांबणार आहे.
पण, आनंद येथे अतिरिक्त थांबा देण्याबाबत रेल्वे प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच, याअनुषंगाने अजून वेळापत्रकात सुद्धा कोणताचं बदल झालेला नाही. यामुळे आनंद रेल्वे स्थानकावर ही गाडी कधीपासून थांबा घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.