तपोवन रस्ता परिसरातून अपहरण झालेल्या युवकाचा खून करून त्याला डोंगरात जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैभव शिवाजी नायकोडी (वय 19, रा. ढवणवस्ती, तपोवन रोड, सावेडी) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांनी त्याला जाळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
ही घटना 22 फेब्रुवारी 2025 रोजी घडली. तपोवन रस्त्यावरील सलून दुकानाजवळून चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी वैभव नायकोडी याचे अपहरण केले. यानंतर त्याला एमआयडीसी परिसरातील केकताई डोंगरात नेऊन अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला जाळून टाकण्यात आले.

या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांनी 27 फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चौघा संशयितांना ताब्यात घेतले आणि चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
तोफखाना पोलिसांनी अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी (वय 23, रा. एमआयडीसी, नवनागापूर), सुमित बाळासाहेब थोरात (वय 24, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर), महेश मारोतीराव पाटील (वय 26, रा. शिवाजीनगर, नवनागापूर) आणि नितीन उर्फ निशिकांत अशोक नन्नवरे (वय 25, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) यांना अटक केली.
आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चौकशीत आरोपींनी 23 फेब्रुवारी रोजी वैभवला मारहाण करून केकताई डोंगरात जाळून टाकल्याची कबुली दिली. त्यामुळे अपहरणाच्या गुन्ह्यात खूनाचा कलम वाढवण्यात आला आहे.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. आता पोलिसांकडून गुन्ह्याचे कारण, आरोपींमागील मास्टरमाइंड आणि आणखी कोण सामील होते का, याचा शोध सुरू आहे.