राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘क्रांतिज्योती’ योजना सुरू केली असून, यामुळे ग्रामपंचायत प्रशासनातील ‘सरपंच पती’ संस्कृतीला आळा बसेल. महिलांना 50% आरक्षण मिळाले असले तरी, प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये सरपंच पतीच संपूर्ण सत्ता हाताळताना दिसतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी महिलांना सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.
महिला सरपंचांसाठी विशेष प्रशिक्षण
पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी अग्रगण्य संस्था आहे. यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी महिला सक्षमीकरणासाठी ‘क्रांतिज्योती’ मॉडेल तयार केले. याअंतर्गत, मागास भागातील महिला सरपंचांना प्रशासन, धोरणे आणि निर्णय क्षमता यांसाठी प्रशिक्षित केले जात आहे. 2014 पासून या मॉडेलवर काम सुरू होते, पण यशदामध्ये रुजू झाल्यावर याला अधिक व्यापक स्वरूप देण्यात आले. महिला सरपंचांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशिक्षित केले जात आहे. यामुळे त्यांची निर्णयक्षमता, संवाद कौशल्य आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढणार आहे.

पतिराजांचा हस्तक्षेप थांबणार
या योजनेच्या माध्यमातून महिला सरपंचांना स्वयंपूर्ण बनवून पतिराजांची लुडबुड थांबवली जाणार आहे. मागास भागातील 27 तालुक्यांमधून निवडलेल्या महिला सरपंचांनी आता स्वतःच्या निर्णयाने ग्रामपंचायतीचे संचालन सुरू केले आहे. परभणीच्या स्नेहा अरुण देव या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना ‘क्रांतिज्योती’ योजनेच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नेमण्यात आले आहे. त्या महिलांना सभेत आत्मविश्वासाने बोलणे, ग्रामपंचायतीच्या सभांचे व्यवस्थापन, निर्णय नोंदी ठेवणे, विकास कामांवर लक्ष ठेवणे याचे प्रशिक्षण देत आहेत.
प्रत्येक तालुक्यातून 25 महिला सरपंचांची निवड
राज्यातील पालघर, नंदूरबार, नाशिक, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, धाराशिव, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, सोलापूर, वाशिम या 15 जिल्ह्यांतील 27 तालुक्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातून 25 महिला सरपंचांची निवड करण्यात आली असून, एकूण 675 महिला प्रशिक्षण घेत आहेत. आतापर्यंत 202 महिला सरपंचांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. प्रशिक्षण घेतलेल्या महिला सरपंचांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि तालुक्यातील समस्या उघडपणे मांडल्या, त्यामुळे तातडीने विकासकामे सुरू करण्यात आली आहेत.
माझ्या प्रशासकीय सेवेतील हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता. २०१४ पासून मी यावर काम करीत होतो. सेवानिवृत्त झाल्यावर यशदामध्ये उपसंचालक म्हणून रुजू झालो आणि क्रांतिज्योती मॉडेलला अधिक गती आली. त्यातूनच या महिला सरपंच तयार झाल्या. -डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, उपमहासंचालक तथा संचालक, राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा, पुणे