चास शिवारातील खुनाचा उलगडा ! पोलिसांनी आरोपीस आग्रा येथे जाऊन केली अटक

Published on -

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर तालुक्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. 17 फेब्रुवारी 2025 रोजी हॉटेल स्वामी समर्थ, अहिल्यानगर-पुणे महामार्गावर, भोयरे पठारकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा मृतदेह आढळला. पोलिसांनी सुरुवातीला याला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, वैद्यकीय अहवालातून हा खून असल्याचे स्पष्ट झाले. अज्ञात इसमाने गळा आवळून हत्या करून मृतदेह टाकल्याचे निष्पन्न झाले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या जलद तपासामुळे …

या घटनेची गंभीर दखल घेत अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर (स्थानिक गुन्हे शाखा) यांना तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानुसार सपोनि हेमंत थोरात, पोसई राजेंद्र वाघ आणि पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, हृदय घोडके, फुरकान शेख, विश्वास बेरड, अरूण गांगुर्डे, सागर ससाणे, सागर मिसाळ, रोहित येमुल, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे आणि अरूण मोरे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

सीसीटीव्ही तपास आणि आरोपीचा शोध

गुन्ह्याच्या तपासासाठी अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील 40-50 हॉटेल्स आणि धाब्यांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली. तपासादरम्यान घटनास्थळापासून 4 किमी अंतरावर एक बेवारस अपघातग्रस्त मोटरसायकल आढळून आली. ही मोटरसायकल सुनिल बाबुराव काळे, रा. कुंभेफळ, छत्रपती संभाजीनगर याच्या नावावर असल्याचे समोर आले.

आरोपीस आग्र्यातून अटक

पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर ते चास आणि चास ते सुपा टोलनाका दरम्यानच्या 171 सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. अखेर सातत्याने तपास करून आरोपी खुशालसिंग उर्फ रविराज सत्यप्रकाश नाईठाकूर (रा. बिजमाई, आग्रा, उत्तरप्रदेश) याच्यावर संशय बळावला. दरम्यान 2 मार्च 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तरप्रदेशमधील आग्रा जिल्ह्यात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

दारूच्या नशेत वादातून जीवघेणा हल्ला

तपासात असे समोर आले की, मयत सुनिल काळे 17 फेब्रुवारीला हॉटेल साई दरबार, सुपा टोलनाका येथे दारू पिण्यासाठी थांबला होता. तेथे त्याची ओळख आरोपी खुशालसिंगसोबत झाली. दोघांनी दारू प्यायल्यानंतर मयताने आरोपीकडे राहण्यासाठी खोलीबाबत विचारणा केली. आरोपीने मयताला खोली दाखवण्यासाठी मोटरसायकलवर बसवून नेले. मात्र, दारूच्या नशेत मयताने आरोपीला शिवीगाळ केली. या वादातून आरोपीने मयताचा रूमालाने गळा आवळून निर्घृण हत्या केली.

15 दिवसांत गुंतागुंतीचा गुन्हा….

ताब्यात घेतलेल्या आरोपीला नगर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी आरोपी आहेत का, याचा तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अवघ्या 15 दिवसांत अत्यंत गुंतागुंतीचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe