UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस हा आता भारतातील सर्वसामान्य लोकांसाठी दैनंदिन आर्थिक व्यवहारांचा महत्त्वाचा भाग बनला आहे. डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरासोबतच याच्या सुरक्षिततेवरही विशेष लक्ष दिले जात आहे. 1 एप्रिल 2025 पासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे बदल UPI व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी करण्यात आले आहेत, त्यामुळे वापरकर्त्यांनी हे नवीन नियम जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
बँका हटवणार अनावश्यक आणि बंद मोबाईल नंबर
NPCI ने सर्व बँकांना आणि UPI सेवा पुरवठादारांना निर्देश दिले आहेत की, 1 एप्रिल 2025 पासून असे मोबाईल नंबर हटवले जातील, जे पूर्वी इतर वापरकर्त्यांना दिले गेले होते किंवा आता बंद झाले आहेत. यामुळे चुकीच्या क्रमांकांवर होणाऱ्या UPI व्यवहारांना आळा घालता येईल आणि फसवणुकीची शक्यता कमी होईल.

UPI सिस्टम होणार अधिक अपडेटेड आणि सुरक्षित
UPI व्यवहारांमध्ये कोणतीही त्रुटी होऊ नये यासाठी NPCI ने बँकांना आणि पेमेंट सर्व्हिस प्रोवायडर्सना नियमितपणे सिस्टम अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 16 जुलै 2024 रोजी झालेल्या NPCI बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि आता तो 1 एप्रिल 2025 पासून लागू केला जाणार आहे.
यामध्ये सर्व UPI सेवा देणाऱ्या अॅप्सना आणि बँकांना नियमितपणे आपल्या सिस्टम अपडेट करणे बंधनकारक असेल, जेणेकरून फसवणूक किंवा चुकीचे व्यवहार होण्याच्या घटना टाळता येतील.
मोबाईल नंबर अपडेट करणे होणार अनिवार्य
यापुढे UPI व्यवहारांसाठी वापरकर्त्यांनी आपला मोबाइल नंबर अपडेट करणे अनिवार्य असेल. UPI अॅप्समधूनच हे अपडेट करता येईल आणि यासाठी वापरकर्त्यांची सहमती आवश्यक असेल. जर मोबाइल नंबर अपडेट केला गेला नाही, तर त्या नंबरवरून UPI व्यवहार करणे शक्य होणार नाही.
बँकांना NPCI कडे सादर करावी लागणार मासिक माहिती
UPI सेवा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी 1 एप्रिल 2025 पासून सर्व बँका आणि UPI सेवा देणाऱ्या अॅप्सना NPCI कडे मासिक रिपोर्ट सादर करावा लागेल. या रिपोर्टमध्ये मोबाईल नंबरशी लिंक असलेल्या UPI आयडींची संख्या, अॅक्टिव्ह वापरकर्त्यांची संख्या आणि महिन्यातील UPI व्यवहारांची संख्या यांचा समावेश असेल.
UPI व्यवहार आता होणार अधिक सुरक्षित
UPI पेमेंट सुरक्षित ठेवण्यासाठी NPCI ने या नवीन नियमांची घोषणा केली आहे. जर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असलेल्या UPI सेवा विनाअडथळा वापरायच्या असतील, तर 1 एप्रिल 2025 पूर्वी मोबाईल नंबर अपडेट करणे आणि UPI अॅप्सशी लिंक असलेली सर्व माहिती वेळच्या वेळी अपडेट ठेवणे आवश्यक आहे. या बदलांमुळे UPI व्यवहार अधिक सुरक्षित होतील आणि कोणत्याही संभाव्य फसवणुकीला आळा बसू शकेल.