नवी दिल्ली: केंद्र सरकारने उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ (१२.९ किमी) आणि – गोविंदघाट ते हेमकुंड साहिबजी (१२.४ किमी) अशा दोन रोपवे प्रकल्पांना मंजुरी दिली. या दोन प्रकल्पांवर एकूण ६८११ कोटी – रुपये खर्च येईल. या प्रकल्पांमुळे दोन्ही तीर्थस्थळांपर्यंत पोहोचण्याचा कालावधी कमी होऊन पर्यटनाला चालना मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उत्तराखंडमध्ये दोन रोपवे – प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सोनप्रयागहून केदारनाथला जाण्यासाठी सध्या ८ ते ९ तास लागतात. यामध्ये गौरीकुंडहून १६ किमीचा अवघड चढणीचा मार्ग आहे. रोपवेमुळे अवघ्या ३६ मिनिटांत केदारनाथच्या चरणी पोहोचता येईल, असा दावा वैष्णव यांनी केला. सोनप्रयाग ते केदारनाथदरम्यान १२.९ किमीच्या रोपवे प्रकल्पासाठी ४०८१.२८ कोटी रुपये खर्च येणार आहे. अशाच प्रकारे गोविंदघाट ते हेमकुंड साहिबजी दरम्यान १२.४ किमीचा रोपवे उभारण्यासाठी २७३०.१३ कोटी रुपये खर्च येणार आहे.
