एप्रिल महिन्यात होणार नगर येथील नवीन विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन!

Published on -

विळद, तालुका नगर येथील नवीन होणाऱ्या विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन समारंभ एप्रिल महिन्यात नामदार उद्योग मंत्री उदय सामंत व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

आज उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालय येथे सदर बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार मोनिकाताई राजळे आमदार काशिनाथ दाते, डॉ. सुजय विखे पाटील, महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डचे अधिकारी, कामगार विभागाचे अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी व पारनेर तालुक्यातील प्रतिनिधी गणेश शेळके, सुजित झावरे, विजू आवटी, राहुल शिंदे, सचिन वरात आदी उपस्थित होते.

सदर बैठकीस नवीन नगर येथे होणाऱ्या विस्तारित एमआयडीसी भूमिपूजन संदर्भात तसेच सुपा एमआयडीसीतील उद्योजकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. यामध्ये कुठल्याही प्रकारचा सुपा एमआयडीसीतील उद्योजकांना त्रास होणार नाही, तसेच त्यांनी कुणाच्याही दबावाखाली काम करू नये या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा झाली. तसेच उद्योजकांना वन विंडो सिस्टीमने काम करण्याच्या सुलभतेच्या दृष्टिकोनातून एमआयडीसीचे डेप्युटी सीईओ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये कामगार विभागाचे प्रतिनिधी व महाराष्ट्र प्रदूषण बोर्डचे प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती प्रत्येक उद्योजकांशी स्थानिक पातळीवर चर्चा करून त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी व सोडवणूक करून त्या ठिकाणी त्यांना योग्य ती मदत उद्योग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून करेल असा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

नगरमध्ये होणाऱ्या या एमआयडीसीमुळे उद्योगधंद्याला अधिक चालना मिळेल अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच नगर जिल्ह्यातील मंजूर झालेल्या शिर्डी, श्रीगोंदा, नवीन नगर येथे अनेक उद्योगधंदे आणण्यासाठी तसेच जास्तीत जास्त रोजगार वाढवण्यासाठी उद्योग विभागाकडून प्रयत्न केले जातील अशी खात्री उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

तसेच सुप्यामध्ये उद्योग वाढला पाहिजे व उद्योग वाढत असताना स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा काम करण्याची संधी मिळावी, यासाठी नवीन येणाऱ्या उद्योजकांनी प्रयत्न करावा अशी विनंती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

या बैठकीदरम्यान काशिनाथ दाते यांनी आभार मांडले. तसेच एप्रिल महिन्यामध्ये परत एकदा आजच्या या बैठकीला अनुसरून जे काही प्रश्न मांडले गेले आहेत, त्यांवर योग्य तो मार्ग काढण्यासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी बैठक घेतली जाईल व उद्योगवाढीच्या दृष्टिकोनातून आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सुजय विखेंनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe