नगर जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवर मोठा बदल झाला असून, यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr Pankaj Ashiya) यांची नगर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची पुणे येथे साखर आयुक्त म्हणून बदली झाल्याने हे पद रिक्त होते. त्यामुळे शासनाने तातडीने नवीन जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती केली असून, डॉ. आशिया हे आता नगरचा कारभार सांभाळणार आहेत.
डॉ. पंकज आशिया हे 2016 बॅचचे आयएएस अधिकारी असून, मूळचे राजस्थानमधील जोधपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील डॉक्टर असून, आई गृहिणी आहेत. वडिलांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले, मात्र नंतर त्यांनी प्रशासन क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला.

यूपीएससी परीक्षेसाठी त्यांनी कोणताही खासगी क्लास न लावता स्व-अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात 2016 मध्ये देशात 56वा क्रमांक मिळवत आयएएस झाले. त्यानंतर त्यांची महाराष्ट्र कॅडरमध्ये नियुक्ती झाली.
डॉ. आशिया यांनी मालेगाव (नाशिक) येथे प्रांताधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली, जिथे त्यांनी कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या या कार्याची राज्यभर प्रशंसा झाली. त्यानंतर भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, जिथे त्यांनी नागरी सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणली.
यानंतर त्यांची जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली, जिथे त्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पुढे त्यांना यवतमाळ जिल्हाधिकारीपदी बढती मिळाली.
नगर जिल्हाधिकारी पद रिक्त झाल्याने अनेक अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. अखेर शासनाने डॉ. पंकज आशिया यांची नगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली. येत्या काही दिवसांत नगरमधील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी डॉ. पंकज आशिया यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्या पूर्वीच्या अनुभवाचा फायदा नगर जिल्ह्यास होईल, अशी अपेक्षा आहे. नवीन जिल्हाधिकारी म्हणून ते लवकरच पदभार स्वीकारतील आणि जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी काम करतील.