७ मार्च २०२५ मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य रोहित पवार आणि ‘लय भारी यूट्युब चॅनेल’चे संपादक तुषार खरात यांच्या विरुद्ध ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याबद्दल गुरुवारी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.गोरे यांनी याबद्दल तीन प्रस्ताव मांडल्यावर त्याला भाजपचे सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी अनुमोदन दिले.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या तिन्ही प्रस्तावांचा स्वीकार करून हक्कभंग समितीकडे पाठवत असल्याचे जाहीर केले आहे.
गोरे यांनी स्वतःचा विवस्त्र फोटो एका महिलेला पाठवल्याचा आरोप संजय राऊत यांनी बुधवारी केला असून त्यानंतर रोहित पवार यांनीही गोरे यांच्यावर तसेच आरोप केले होते.खरात यांनी सुद्धा याबद्दल बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामुळे आक्रमक झालेल्या गोरे यांनी या तिघांविरुद्ध गुरुवारी विधानसभेत हक्कभंग झाल्याचा प्रस्ताव सादर केला आहे.न्यायालयाकडून दिलेल्या निर्णयात मी निर्दोष असून या प्रकरणात बिनबुडाचे आरोप केल्यामुळे आपली बदनामी झाल्याचे गोरे यांनी प्रस्तावात म्हटले आहे.

गोरे म्हणाले, संपादक संजय राऊत यांनी २०१७ सालच्या साताऱ्याच्या जिल्हा न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणाचा आधार घेऊन त्यांनी बिनबुडाचे आरोप करत माझी बदनामी केली आहे.चुकीच्या बातम्यांमुळे मला टीका सहन करावी लागत आहे.या गुन्ह्यात न्यायालयाने माझी २०१९ मध्ये निर्दोष मुक्तता केली असून या प्रकरणाशी संबंधित मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेशसुद्धा न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर सुद्धा राऊत यांनी माझी बदनामी करून न्यायालयाचा आणि सार्वभौम सभागृहाचा अपमान केला आहे.
अधिवेशन सुरू असताना पवार यांनी सुद्धा माझ्या बदनामीचा प्रकार केल्यामुळे त्यांच्या विरोधात मी हक्कभंग तक्रार मांडत आहे, तसेच यूट्युब चॅनलच्या माध्यमातून ८७ व्हिडीओ प्रसारित करून माझी, माझ्या कुटुंबाची आणि पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.माझ्या विरोधात मुख्यमंत्री,राज्यपालांना खोटी निवेदने देऊन तक्रार करणे, खोटे आरोप करून आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मी सामान्य घरात जन्माला आलेलो असून कोणत्या संस्थानिकाचा मुलगा नाही तसेच मी राजकारणात पुढे जात आहे,ही पोट दुखी बऱ्याच जणांना होत असल्याची टीका करतानाच गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.हा प्रस्ताव लवकरात लवकर स्वीकार करावा,अधिवेशन संपण्यापूर्वीच या प्रकरणाचा निकाल लावावा,अशी मागणी मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे केली.