७ मार्च २०२५ मुंबई : देशातल्या एचएनडब्ल्यूआय म्हणजेच गर्भश्रीमंतांच्या पुढच्या पिढीची उच्चस्तरीय गुंतवणुकीत तीव्र इच्छा असल्याचे दिसत आहे कारण, जवळपास ४६.५ टक्के लोकांची लक्झरी कार घेण्याची,तर २५.७ टक्के लोकांची लक्झरी घर घेण्याची इच्छा असल्याचे दिसत आहे.या व्यतिरिक्त, त्यापैकी २५.७ टक्के लोकांची उच्च दर्जाची रिअल इस्टेट खरेदी करण्याची इच्छा आहे.परिणामी, ही त्यांची दुसरी सर्वात पसंतीची लक्झरी मालमत्ता बनल्याचे नाईट फ्रैंकच्या वेल्थ रिपोर्ट अहवालामध्ये सांगितले गेले आहे.
खास सांगायचे झाले तर,आर्ट कलेक्शन खरेदी करण्याचे ११.९ टक्के, तर ९.९ टक्के लोकांचे खासगी जेट खरेदी करण्याचे स्वप्न असल्याचे समजत आहे.गंमत म्हणजे १२५,००० डॉलरपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात कला संग्रह, खासगी जेट आणि सुपरयॉट सारख्या इतर लक्झरी प्रापर्टीमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असल्याचेही दिसून आले आहे.

त्यानुसार,जगात पुढच्या पिढीतल्या ३० टक्के जन्मजात श्रीमंत असलेल्या लोकांनी उच्च दर्जाच्या रिअल इस्टेट खरेदीला प्राधान्य दिले आहे,त्यानंतर २७.८ टक्के लक्झरी कार आणि १५.१ टक्के खासगी जेटला प्राधान्य दिले आहे. दिल्ली आणि बंगळुरूने जागतिक लक्झरी निवासी बाजारपेठेत लक्षवेधी प्रगती केली आहे, कारण दोन्ही शहरांनी प्राइम इंटरनॅशनल रेसिडेन्शियल इंडेक्समध्ये लक्षणीय सुधारणा केल्याचेही त्यात दिसून आले आहे.
यात दिल्लीची सर्वात उल्लेखनीय वाढ झाली असून २०२३ मध्ये ३७ व्या स्थानावरून २०२४ मध्ये १८ व्या स्थानावर पोहोचले आहे.ही प्रभावी वाढ लक्झरी निवासी घरांच्या किमतींमध्ये वार्षिक आधारावर ६.७ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे झाली आहे.असाच बदल बंगळुरूमध्येही सकारात्मकपणे दिसून आला आहे.लक्झरी प्रॉपर्टी सेगमेंटमध्ये चांगली मागणी असल्याने ५९ व्या स्थानावरून ४० व्या स्थानावर पोहोचले आहे. २०२४ मध्ये जागतिक लक्झरी निवासी बाजारपेठेत सरासरी ३.६ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
श्रीमंत व्यक्तींच्या पुढच्या पिढ्या संपत्ती निर्माण करण्यात आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील असे दिसून येत आहे.त्याचा परिणाम म्हणून, त्यांच्या इच्छा जागतिक लक्झरी उद्योगासाठी खूप महत्त्वाच्या असतील.भारतातील अति-उच्च-निव्वळ-वर्थ लोकसंख्या वाढत असताना जागतिक लक्झरी ब्रँड्सना भारतीय बाजारपेठेत मजबूत उपस्थिती प्रस्थापित करण्यासाठी नवीन संधी निर्माण होतील.विशेषतः सुपरयॉटसारखे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वापरात नाही आणि भारतात याच्या वाढीसाठी लक्षणीय क्षमता असल्याचे नाईट फ्रैंक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले आहे.