श्रीरामपूर : राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर (भैया) बेग यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आणि संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्रीच्या सुमारास श्रीरामपूर येथील राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांच्यासह अनेक पदाधिकारी व युवा कार्यकत्यांसह प्रवेश केला.
या प्रवेशामुळे पक्षाला नव्या उर्जेसह हिंदुत्ववादी विचारसरणीला अधिक बळ मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सागर बेग हे हिंदू संस्कृतीच्या संरक्षणासाठी व सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय श्रीराम संघाने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.

हिंदू समाज एकसंध राहावा, धर्म व संस्कृती जपली जावी, तसेच युवा पिढीला भारतीय संस्कृतीशी जोडावे, या उद्देशाने त्यांनी संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांच्या कार्याची दखल घेत हिंदुत्ववादी विचारसरणीशी बांधील असलेल्या संघटनांमध्ये त्यांचा प्रभाव वाढला. सागर बेग यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश पक्षासाठी एक मोठी राजकीय शक्ती ठरू शकतो.
एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारधारेचा वारसा पुढे नेताना पक्षात नव्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात सामील करून घेतले आहे. सागर बेग यांची संघटनात्मक ताकद आणि त्यांचा प्रभाव पाहता, शिंदे गटाच्या विस्तारासाठी हा प्रवेश महत्वाचा मानला जातो.
या प्रवेश प्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. सागर बेग यांच्या प्रवेशामुळे हा विचार अधिक व्यापक होईल. त्यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा फायदा पक्षाच्या विस्तारासाठी होणार आहे.
पक्षात प्रवेश घेतल्यानंतर सागर बेग यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मी आजपासून शिवसेना (शिंदे गट) चा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कार्य करणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने झटेन. हिंदुत्व हा केवळ एक विचार नाही, तर तो जीवनशैली आहे आणि त्याचा प्रसार करण्यासाठी मी माझे सर्वस्व देईन.
या प्रवेश सोहळ्याला अनेक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाच्या झेंड्याने आणि जयघोषाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. सागर बेग यांच्या प्रवेशामुळे शिवसेना (शिंदे गट) ला हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचा आणखी मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे हा प्रवेश राजकीय दृष्टिकोनातून तसेच हिंदुत्वाच्या दृष्टीनेही महत्वाचा मानला जात आहे.
सागर बेग यांच्या प्रवेशानंतर शिवसेना (शिंदे गट) ची ताकद वाढणार आहे. आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजासाठी विविध उपक्रम आणि संघटनात्मक बांधणी करण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाच्या हिंदुत्ववादी अजेंड्याला नवसंजीवनी मिळाल्याने पक्षाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीवरही याचा मोठा प्रभाव पडणार आहे.
यावेळी या सर्वांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत करून सत्कार केला. या सोहळ्यात राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष आकाश बेग, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील, राष्ट्रीय श्रीराम संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत शेटे, प्रकाश मेहेत्रे, उभाठा गटाचे माजी नगरसेवक सागर शिंदे, अशोकराव तुपे, राहुल धायगुडे, रोहित यादव पाटील, शहरप्रमुख विशाल जाधव, तेजस मोरगे, सुनिल पवार, गणेश दिवसे आदी उपस्थित होते