मुलीचा बालविवाह रोखला, संतप्त नातेवाईकांनी कुटुंबावरच केला हल्ला!

Published on -

पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे एका तरुणाने आपल्या अल्पवयीन चुलत बहिणीच्या विवाहास विरोध केल्याने संतप्त झालेल्या तिच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी त्याच्या कुटुंबावर हल्ला केला.

या घटनेत तरुणाची आई जखमी झाली असून, हा प्रकार १४ फेब्रुवारी रोजी अमरधाम रस्त्याजवळ बालसुधारगृहाच्या गेटजवळ घडला. या प्रकरणी ६ मार्च रोजी तरुणाने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मुलीच्या आई-वडिलांसह वडिलांच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तरुणाच्या चुलत बहिणीचे लग्न अल्पवयात लावण्याचा प्रयत्न तिच्या वडिलांनी केला होता. मात्र, पीडित मुलीने स्वतःच हा विवाह नको असल्याचे सांगत फिर्यादीला फोन करून मदत मागितली.

या घटनेची माहिती मिळताच फिर्यादीने चाईल्ड लाइनशी संपर्क साधून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पीडित मुलीला बालसुधारगृहात ठेवले. यामुळे तिच्या कुटुंबीयांमध्ये संताप निर्माण झाला.

१४ फेब्रुवारी रोजी फिर्यादी व त्याचे कुटुंबीय पीडित मुलीची भेट घेण्यासाठी बालसुधारगृहात गेले असता संशयित आरोपींनी त्यांना अडवले. “तुम्ही आमची तक्रार केली ना?” असे म्हणत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कुटुंबीयांवर हल्ला करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News