Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी व्हावे या अनुषंगाने शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. सध्या शहरातील दोन मार्गांवर मेट्रो धावत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू असून या मार्गांचे विस्तारीकरणं करण्याचे काम सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, आता पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड भागाला आणखी एका मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. पिंपरी चिंचवड शहराला दापोडी ते निगडी या मेट्रो मार्गानंतर 35 ते 40 किलोमीटर अंतराच्या एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे.

निगडी ते चाकण दरम्यान हा नवा मेट्रो मार्ग तयार होणार आहे. सध्या या मेट्रो मार्गाचा डीपीआर अर्थात सर्वकष प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला म्हणजे महामेट्रोकडून या मार्गाचा डीपीआर तयार केला जात आहे.
या मार्गामुळे पिंपरी चिंचवडमधील जवळपास 75 टक्के भाग मेट्रो सोबत जोडला जाणार असा दावा करण्यात आला आहे. याद्वारे पिंपरी चिंचवड शहराला दक्षिण भाग तसेच, भोसरीकडील भागाला मेट्रोची भेट मिळणार आहे. या मेट्रो मार्गाद्वारे पिंपरी चिंचवड शहरातील वाकड आणि पिंपळे सौदागर हा एक महत्वाचा आयटीचा परिसर मेट्रोने जोडला जाणार आहे.
आतापर्यंत पुणे शहरात मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले जात होते. त्या तुलनेने पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात नव्हते, पण आता या नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गामुळे आणि आधीच्या निगडी ते दापोडी या मार्गामुळे पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांशी भाग मेट्रोने जोडला जाणार असून यामुळे शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
काय आहेत डिटेल्स?
दरम्यान या नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्गाचा आराखडा म्हणजेच डी पी आर हा येत्या चार ते पाच महिन्यात पूर्ण होईल त्यानंतर महापालिकेकडून या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर मग राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
सर्व स्तरावरून या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर मग प्रत्यक्षात याचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर येत्या चार ते पाच महिन्यात तयार झाला तर या संपूर्ण प्रकल्पाला मंजुरी मिळण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा काळ लागणार आहे.
खरंतर, या मेट्रो मार्गाचा आराखडा याआधी दोनदा तयार करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा या मेट्रो मार्गाचा नव्याने आराखडा तयार होणार आहे. आता आपण हा मेट्रो मार्ग नेमका कसा राहील ? याचा एक आढावा घेणार आहोत.
कसा राहणार मेट्रोचा नवा मार्ग?
मेट्रोचा हा नवा मार्ग जवळपास 35 ते 40 किलोमीटर अंतराचा राहणार असून यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांशी भाग मेट्रो ने कनेक्ट होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
हा मेट्रो मार्ग निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक स्टेशन, रावेत, मुकाई चौक, पुणे-मुंबई-बंगळुरू महामार्ग, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण असा तयार केला जाणार असून यामुळे या संबंधित भागातील नागरिकांना फारच दिलासा मिळणार आहे.