Maharashtra Ladaki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महिला आर्थिक सशक्तीकरणाच्या दिशेने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांना अपेक्षित २१०० रुपयांचा हफ्ता अद्यापही मिळालेला नाही. निवडणुकीच्या काळात महिलांना १५०० रुपये हफ्त्याच्या रकमेत वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र निवडणुकीनंतर तीन महिने उलटून गेले तरीही वाढीव हफ्ता खात्यात जमा झालेला नाही. त्यातच आता राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे ही रक्कम वाढवण्यावर सरकारने मर्यादा घातली आहे, असा अहवाल समोर आला आहे.
रकमेत वाढ नाहीच
महायुतीच्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे नमूद केले होते की योजनेचा हप्ता २१०० रुपये केला जाईल. मात्र, आता सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या तिजोरीवरील वाढत्या भारामुळे या रकमेत वाढ होणार नाही. राज्य सरकारने आतापर्यंत ४६,००० कोटींची तरतूद केली होती, मात्र वाढत्या आर्थिक ताणामुळे आता १५०० रुपयांचाच हफ्ता सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

५ लाख महिला अपात्र
लाडकी बहीण योजनेत आता कडक निकष लागू करण्यात आले आहेत, त्यामुळे ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अर्जाची छाननी करताना विविध अटी लावण्यात आल्या आहेत, ज्या आधी नव्हत्या. त्यामुळे लाखो अर्ज बाद करण्यात आले असून, महिला यावर नाराजी व्यक्त करत आहेत.
निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच लाभ !
गेल्या काही दिवसांपासून ही योजना रद्द होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही. सरकारने ४५,००० कोटींची तरतूद केली आहे, मात्र निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच लाभ दिला जाणार आहे.
योग्य लाभार्थ्यांनाच मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, “आम्ही सुरुवातीला कोणतीही छाननी केली नव्हती, त्यामुळे काहींनी चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला. त्यामुळे आता कठोर निकष लागू करून योग्य लाभार्थ्यांनाच मदत दिली जाईल.”
महिलांमध्ये संभ्रम
लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याबाबत महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढीव २१०० रुपये मिळतील की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सरकारने योजना बंद न करण्याचा निर्णय घेतला असला तरी, महिला आक्रमक झाल्यास राज्य सरकारवर दबाव वाढू शकतो.