यंदा शाळांच्या उन्हाळी सुट्टया १५ दिवसांनी घटल्या ! शिक्षकांसमोर ४ दिवसांत निकाल देण्याचे आव्हान

Published on -

१० मार्च २०२५ शहापुरः दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात परीक्षा होऊन विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टया दिल्या जात होत्या. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ मे नंतर शैक्षणिक सुट्टया लागत होत्या. मात्र यंदा पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकर सुरू होणार आहेत. परंतु त्यानंतर अर्थात एप्रिलच्या उत्तरार्धात मूल्यमापन चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यामुळे विद्याथ्यर्थ्यांना २५ एप्रिल पर्यंत शाळेत यावे लागणार आहे. परिणामी सुट्ट्यांचा कालावधी सुमारे १५ दिवसांनी कमी झाला आहे. याबाबत शिक्षण विभागाने तालुक्यातील सर्व शाळांना आदेश दिले आहेत.यावर्षी वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी २ तसेच नियतकालिक मूल्यांकन अर्थात पीएटी चाचण्या ८ ते २५ एप्रिल या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. तसे सुट्ट्यांच्या कपातीचे परिपत्रक आणि परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे.

सर्वच शाळांच्या वार्षिक परीक्षा एकाचवेळी घेण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु आता शिक्षण विभागाच्या या नियोजनावर शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षण विभागाच्या सूचनेस अनुसरून २०२४ – २०२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-१ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु आता एप्रिलमध्ये कडक उन्हाळा असताना विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी रद्द करत शाळेत यावे लागणार आहे. पालकांचे देखील सुट्टी कालावधीत बाहेरगावी जाण्याचे नियोजन कोलमडणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाला शिक्षक संघटनांकडून विरोध होत आहे.

शिक्षण विभागाच्या या आहेत सूचना

वेळापत्रकाचा सुनियोजित वापर करण्यात यावा. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा स्वतंत्रपणे घ्यावी, शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्यायची आहे. पॅट-३ अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाहीत, अशा सूचनांचा परिपत्रकात समावेश आहे.

यंदा एकाच वेळी नियमित परीक्षा आणि संकलित मूल्यमापनाचे नियोजन सोपविण्यात आल्याने शिक्षकांची धावपळ होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना ज्या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुट्टया दिल्या जातात. त्या पंधरा दिवसांनी कमी होणार आहेत. यामुळे दोन परीक्षांचे नियोजन करताना कमी अवधी मिळणार असल्याने चार दिवसांतच गुणपत्रिका कशा तयार करायच्या, असा प्रश्न आहे. – विनोद लुटे, ठाणे जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी सुट्टया कपातीचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार तालुक्यातील शाळांना सूचना दिल्या आहेत. – भाऊसाहेब चव्हाण, गटशिक्षणाधिकारी, शहापूर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe