बिबट्याचा थरार! उसाच्या शेतातून बाहेर पडत वृद्धावर हल्ला, 3 तरुण जखमी

Published on -

अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर जवळील कोहंडी शिवारात रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. ऊस तोडण्यापूर्वी शेतकऱ्याने उसाचे क्षेत्र जाळल्याने, त्यात लपलेला बिबट्या अचानक धावत बाहेर आला.

समोर झाडाखाली बसलेल्या यशवंत रामा कचरे (वय ६५) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो पुढे पळाला, मात्र परत माघारी फिरत त्याने राजू रामचंद्र परते (वय २५), कैलास प्रकाश तपासे (वय २५) आणि तुषार लिंबा परते (वय २०) या तिघांवर देखील हल्ला केला.

या घटनेमुळे कोहंडी आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने अचानक हल्ला केल्याने शेजारी खेळणारी लहान मुले घाबरून घरात पळाली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने वनविभाग आणि पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच राजूर वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळे, वनपाल एस. एन. बेनके, वनरक्षक बी. डी. जाधव, किसन दिघे, संतोष दिघे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी जखमींना तातडीने राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर अभिनय लहामटे यांनी प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारासाठी जखमींना अहिल्यानगर येथे हलविण्यात आले.

बिबट्याने हल्ला केल्यानंतर संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी ‘रेबीज इम्युनोग्लोबुलिन’ इंजेक्शन आवश्यक असते. मात्र, हे इंजेक्शन जिल्हा रुग्णालयातच उपलब्ध असल्याने जखमींना नाशिक किंवा अहिल्यानगर येथे हलवावे लागले. नाशिक जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नसल्याने अखेर त्यांना अहिल्यानगर येथे जावे लागले.

हा प्रकार वारंवार घडत असल्याने स्थानिक नागरिकांनी तालुका स्तरावरही रेबीज इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागात असे प्रकार घडल्यास जखमींना मोठ्या शहरांमध्ये हलवावे लागते, त्यामुळे वेळेचा मोठा अपव्यय होतो. प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

बिबट्याने माणसांवर हल्ला केल्याने तो पुन्हा गावाजवळ येण्याची भीती ग्रामस्थांना वाटत आहे. वनविभागाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच, गावकऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe