१० मार्च २०२५ नवी दिल्ली : जागतिक अनिश्चिततेच्या काळात, चांदीदेखील गुंतवणूकदारांना आकर्षित करीत आहे आणि यावर्षी आतापर्यंत सुमारे ११ टक्के परतावा दिला आहे. पुढील दोन-तीन वर्षांत चांदी परताव्याच्या बाबतीत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये जास्त चढ-उतार असल्याच्या कारणाने गुंतवणूक मालमत्ता तसेच औद्योगिक धातू म्हणून उपयुक्त आणि आकर्षक आहे. पण चांदी सोन्यापेक्षा जास्त परवडणारी आहे, ज्यामुळे लहान गुंतवणूकदारांना ती खरेदी करणे सोपे होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या वर्षात एमसीएक्स फ्युचर्समध्ये देशातील चांदीच्या किमतीत १७.५० टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ही वाढ १० वर्षांच्या सरासरी ९.५६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या दोन वर्षांत चांदीने चांगली कामगिरी दाखवली आहे आणि यावर्षीही आतापर्यंत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
चांदीच्या अलिकडच्या कामगिरीमुळे, गुंतवणूकदार भविष्यात तिच्या शक्यतांबद्दल सावध झाले आहेत. सध्या, जागतिक आर्थिक संकटाच्या काळात २५ एप्रिल २०११ रोजी स्थापित केलेल्या ५० डॉलर प्रतिऔंस या विक्रमी उच्चांकी दरापेक्षा चांदीचा भाव सुमारे ३५ टक्क्यांनी खाली आहे. बाजारात तेजीची आशा बाळगणाऱ्यांसाठी ही किंमत पातळी एक आकर्षक प्रवेश ठरू शकते, असे मत मेहता इक्विटीज लिमिटेडचे उपाध्यक्ष (कमोडिटीज) राहुल कलंत्री
यांनी व्यक्त केले.
औद्योगिक धातू असल्याने चांदीची किंमत खूपच अस्थिर राहिली आहे. अनिश्चित आर्थिक गुंतवणुकीच्या परिस्थितीत याचा विचार केला जातो. तथापि, मजबूत मूलभूत तत्त्वे आणि इतर मौल्यवान धातूंच्या तुलनेत स्वस्त किमतींमुळे, पुढील दोन-तीन वर्षांच्या परिस्थितीत चांदी इतर मौल्यवान धातूंपेक्षा परतावा देण्याच्या बाबतीत मागे टाकेल, अशी अपेक्षा आहे. म्हणूनच, उच्च परतावा लक्षात घेता, चांदीमध्ये गुंतवणूक करणे अजूनही चांगले दिसते, असे आनं आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सचे संचालक (कमोडिटीज अँड करन्सीज) नवीन माथूर म्हणाले.
१५ वर्षांत सातवेळा नकारात्मक परतावा
गेल्या १५ वर्षांत चांदीने सातवेळा नकारात्मक परतावा दिला आहे, तर सोन्याने त्याच कालावधीत फक्त तीनवेळा नकारात्मक परतावा दिला आहे. दीर्घकालीन धोरण असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ७०:३० वाटप (सोन्यात ७० टक्के आणि चांदीत ३० टक्के) किंवा आक्रमक गुंतवणूकदारांसाठी ६०:४० वाटप आदर्श आणि श्रेयस्कर मानले जाते. किमतीतील चढ-उतार अल्पकालीन नफ्याच्या संधी प्रदान करतात. औद्योगिक मागणी (सौर पॅनेल, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स) सोबत भविष्यात चांदीची किंमत वाढू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सुरक्षित गुंतवणूक म्हणून कल
अमेरिकेच्या अनिश्चित व्यापार धोरणामुळे यावर्षी चांदीची किंमत सतत वाढत आहे. यामुळे या वर्षी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पांढऱ्या धातूमध्ये गुंतवणूक वाढली आहे. चांदीचे मूलभूत घटक मजबूत आहेत, औद्योगिक मागणी मजबूत आहे आणि २०२५ पर्यंत अमेरिकेतील प्रमुख व्याजदर कमी होण्याची अपेक्षा आहे. म्हणूनच यावर्षी चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूक मालमतेकडे कल वाढत आहे, असेही माथूर म्हणाले.