१० मार्च २०२५ नवी दिल्ली: जानेवारीमध्ये देशातील महागाईचा दर ५.२२ टक्क्यांवरून ४.३१ टक्क्यांवर घसरला. सलग चार महिने महागाई ५ टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेच्या स्वीकारार्ह ४ टक्क्यांच्या लक्ष्याजवळ गेली. यामुळे संभाव्य दर कपातीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या रेपो दर ६.२५ टक्के आहे, असे मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडच्या अहवालामध्ये म्हटले आहे.
बाजारातील परिस्थिती बघता गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीची भूमिका दिसून येत असून ती क्षेत्र विशिष्ट घडामोडी, जागतिक वित्तीय बाजारातील कल यांच्याशी जोडलेली आहे. फेब्रुवारीमध्ये निफ्टी ५०० निर्देशांक ७.८८ टक्क्यांनी घसरला. जागतिक स्तरावर विकसित बाजारपेठांमध्ये संमिश्र घडामोडी दिसून आल्या. यात स्वित्झर्लंडमध्ये ३.४७ टक्के आणि ब्रिटनमध्ये ३.०८ टक्के वाढ झाली, तर जपानमध्ये १.३८ टक्क्यांनी घट झाली, असे अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेत ग्राहक किमतीवर आधारित महागाई ३ टक्के आहे, ज्यामध्ये मागील महिन्याच्या २.९० टक्क्यांपेक्षा किरकोळ वाढ दर्शवते.भारताचा दीर्घकालीन दृष्टिकोन मजबूत आहे आणि पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात सरकारी गुंतवणूक, खासगी गुंतवणुकीत वाढ आणि रिअल इस्टेट चक्रात सुधारणा यामुळे मध्यम कालावधीत गुंतवणूक चक्र वाढण्याची अपेक्षा आहे. भारताच्या जलद वाढीला पाठिंबा देण्यासाठी अक्षय ऊर्जा आणि संबंधित पुरवठा साखळ्यांमध्ये जास्त खासगी गुंतवणूक, उच्च दर्जाच्या तंत्रज्ञान घटकांचे स्थानिकीकरण आणि जागतिक पुरवठा साखळीचा अर्थपूर्ण भाग बनण्याची अपेक्षा एचएसबीसी म्युच्युअल फंडच्या ‘मार्केट आऊटलूक रिपोर्ट २०२५’ मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
आता पर्यंत वास्तविक अर्थव्यवस्थेने जागतिक घडामोडींना लवचिकता दाखवली आहे. महागाई आकडेवारी, मागील एमपीसी धोरण कृती आणि एमपीसी मिनिट्सच्या आधारे, रिझर्व्ह बँक एप्रिलच्या धोरणात दरांमध्ये आणखी २५ बेसिस पॉइंटची कपात करेल तसेच त्यांच्या तरलता धोरणावर अनुकूल आणि लवचिक राहील, असे अहवालात भाकीत केले आहे