Maharashtra Metro News : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडताना अनेक मोठ्या घोषणा केल्यात. मेट्रोबाबतही आजच्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. खरंतर मुंबई, नागपूर, पुणे या महानगरांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक पर्यावरण पूरक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी अनुषंगाने मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहेत.
सध्या मुंबई, नागपूर आणि पुण्यात जे मेट्रो मार्ग सुरू आहेत त्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. अशातच आता आगामी पाच वर्षात आपल्या राज्यात 237 किलोमीटर हुन अधिक लांबीचे मेट्रो मार्ग तयार होणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

सध्या मुंबई, नागपूर व पुणे शहरात एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. या मेट्रो मार्गामुळे या संबंधित शहरातील नागरिकांचा प्रवास वेगवान आणि सुरक्षित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शहरांमध्ये सुरू असणाऱ्या मेट्रो मार्गांचा लाभ सुमारे 10 लाख प्रवासी रोज घेत आहेत.
दरम्यान आता येत्या काही वर्षात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तयार केले जाणार आहेत. यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर शहरात येत्या काही वर्षात 23.2 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत.
म्हणजे मुंबई आणि पुण्यात एकूण 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. तसेच संपूर्ण राज्यात येत्या 5 वर्षांत एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज केली.
नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात 6 हजार 708 कोटी रुपये किंमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. शिवाय, ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.
पुणे मेट्रो रेल्वे टप्पा-2 अंतर्गत खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी आणि नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग या दोन मार्गिकांचा 9 हजार 897 कोटी रुपये किंमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला असल्याची माहिती अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी आज दिली आहे.
एकंदरीत येत्या काही वर्षात राज्यातील मेट्रो मार्गांचे जाळे आणखी मजबूत होणार आहे आणि यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल अशी आशा आहे.