स्वतःच्या घरामागेच सापडला तरुणाचा मृतदेह ; हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय

११ मार्च २०२५ करंजी : पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या संत्र्याच्या बागेत आढळून आला आहे.

मृतदेहावर मारहाणीच्या खुणा असून प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार असल्याचे निदर्शनास येत आहे.सोमनाथ रामराव पाठक (वय ३५) असे मयताचे नाव आहे.

सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मयत सोमनाथ याच्या डोक्याला मार असून पाय मोडून टाकलेले दिसत आहेत.

पाठीवर तसेच हातावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या.सोमनाथ पाठक याचे तिसगाव येथे मेडिकल दुकान होते परंतु काही कारणास्तव ते त्यांनी काही दिवसापूर्वी बंद केले असल्याचे समजते.त्यास एक मुलगा आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील, पाथर्डी पोलिस स्टेशनचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.

यावेळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञास पाचारण केले होते. शवविच्छेदन अहवालानंतर सोमनाथ पाठक यांच्या मृत्यूचे कारण उघड होईल.

घातपात निष्पन्न झाल्यास गुन्हेगारांना लवकरच गजाआड केले जाईल, असे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सांगितले.