शिर्डीत पनीर भेसळ करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Updated on -

११ मार्च २०२५ साकुरी : शिर्डी व परिसरात लग्नसराई तसेच विविध कार्यक्रमांमध्ये जेवणावळींसाठी पनीरला मोठी मागणी आहे. हॉटेल, ढाबे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्येही पनीर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते; मात्र वाढत्या मागणीमुळे हलक्या दर्जाचे आणि बनावट पनीर मोठ्या प्रमाणावर विकले जात असून, अन्न व औषध भेसळ विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या हलक्या दर्जाच्या पनीरचा रंग व पोत वेगळा असतो. रबरासारखे आणि पिठाळसर असलेले हे पनीर खाण्यासाठी अपायकारक आहे. काही जिल्ह्यांमध्ये अन्न व औषध भेसळ प्रशासनाने बनावट पनीरविरोधात कारवाई केली असली, तरी शिर्डी परिसरात अशा कारवाया होत नसल्याने बनावट पनीर खुलेआम विकले जात आहे. केवळ जागरूक ग्राहक नामांकित ब्रँडचे पनीर खरेदी करत असले, तरी अनेक हॉटेल, ढाब्यांमध्ये बनावट पनीरच वापरले जात आहे.

चीज अनॅलॉग नावाचा पदार्थ पनीर म्हणून विक्रीस ठेवला जात आहे. लग्नसराईचा हंगाम आणि उन्हाळा पाहता पनीरची मागणी वाढत असल्याने हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळयुक्त पनीर जप्त करून नष्ट करण्यात आले आहे. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणावर बनावट पनीर बाजारात येत असून, याकडे अन्न भेसळ विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

तज्ज्ञांच्या मते, बनावट पनीरचे नियमित सेवन केल्यास हगवण, उलट्या यांसारखे आजार होऊ शकतात. दीर्घकाळ अशा प्रकारचे रासायनिक पनीर खाल्ल्यास हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढतो. लहान मुलांच्या शारीरिक वाढीवरही त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक राहून दर्जेदार आणि विश्वसनीय पनीर खरेदी करावे, अशी तज्ज्ञांकडून सूचना देण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe