११ मार्च २०२५ शिर्डी : २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील प्रलंबित विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळावा, अशी मागणी शिर्डी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिताताई जगताप व माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप आणि माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करते.नुकतीच नाशिकच्या पालकमंत्र्यांनी विकास कामांसंदर्भात प्रशासनाच्या बैठकांना सुरुवात केली आहे. त्या धर्तीवर शिर्डी तीर्थ क्षेत्रालाही विशेष निधी मिळावा, अशी मागणी होत आहे.

शिर्डीतील अनेक विकासकामे निधी अभावी अपूर्ण आहेत. शिर्डी नगरपरिषद आणि श्री साईबाबा संस्थानने यासंदर्भात मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन प्रस्ताव तयार करावा आणि तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकारकडे पाठवावा. यासाठी मंत्री विखे पाटील यांनी तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणीही जगताप यांनी केली आहे.
१५ वर्षांपूर्वीही कुंभमेळ्यानिमित्त शिर्डीसाठी निधी मंजूर झाला होता, मात्र तो अपूर्ण राहिल्याने अपेक्षित विकासकामे झाली नाहीत. शिर्डी नगरपरिषद हद्दीतील अनेक भूखंडांचे संपादन बाकी असून, निधी अभावी हे काम थांबले आहे. परिणामी, शिर्डीतील रस्ते, बगीचे आणि मैदाने यांचा विकास रखडला आहे.नगरपरिषद आणि सरकारने भूखंडधारकांना मोबदला म्हणून एफएसआय देण्याचा निर्णय घेतला असला, तरी बहुतांश जमिनधारकांना प्रत्यक्ष आर्थिक मोबदला हवा आहे. त्यामुळे भूसंपादन रखडले असून विकासकामांवर त्याचा परिणाम होत आहे.
श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषद यांनी पुढाकार घेऊन या जमिनी खरेदी केल्यास नागरिक सहकार्य करण्यास तयार आहेत.कुंभमेळ्यासाठी शिर्डीत येणाऱ्या लाखो भाविकांसाठी योग्य सुविधा पुरवण्यासंदर्भात नियोजन करून बैठका घेण्याची गरज आहे. यासाठी शिर्डीकरांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करावा.
या माध्यमातून श्री साई सृष्टी, थीम पार्क, लेझर शो, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये, उद्याने आदी प्रकल्पांसाठीही निधी मिळावा, असेही जगताप यांनी म्हटले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष निधीसाठी विनंती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.