भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या व्यसनाधीन भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील सातवड गावात घडला आहे. आई आणि स्वतःच्या मुलाला वारंवार मारहाण करणाऱ्या भावाचा अखेर डॉक्टर असलेल्या भावानेच काटा काढला. पोलिस तपासात या हत्येचा उलगडा झाला असून, डॉक्टर अशोक रामराव पाठक (३९, रा. सातवड, ता. पाथर्डी) याला अटक करण्यात आली आहे.
दारूच्या व्यसनामुळे
सोमनाथ रामराव पाठक (३२, रा. सातवड, ता. पाथर्डी) याला दारूचे अतिशय वाईट व्यसन होते. या व्यसनामुळे त्याने आई आणि स्वतःच्या मुलाला मारहाण करणे, जीवे ठार मारण्याच्या धमक्या देणे हे रोजचेच झाले होते. कुटुंबासाठी हा प्रकार असह्य बनला होता. सोमनाथचा सख्खा भाऊ अशोक पाठक हा डॉक्टर असून, तो वारंवार भावाला दारू सोडण्यासाठी समजवत होता, मात्र कोणताही परिणाम होत नव्हता.

रागाच्या भरात धक्कादायक निर्णय
९ मार्च रोजी डॉक्टर अशोक पाठक आपल्या भावाला समजवण्यासाठी गावी गेला होता. मात्र, त्याच्यासमोरच सोमनाथने पुन्हा आई व मुलाला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे रागाच्या भरात डॉक्टर भावाने लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण केली. झालेल्या मारहाणीतून वाचण्यासाठी सोमनाथ संत्र्याच्या शेतात पळाला, मात्र डॉक्टरने त्याचा पाठलाग करून त्याला संत्र्याच्या झाडाला बांधले.
आईने पाहिला मृतदेह
दुसऱ्या दिवशी आई सिंधूताई पाठक पहाटे मोटार चालू करण्यासाठी गेल्या असता त्यांना मुलाचा मृतदेह शेतात आढळला. त्यांनी त्वरित पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.घटनास्थळी झालेल्या प्राथमिक तपासादरम्यान हा खून असल्याचा पोलिसांना संशय आला. चौकशीदरम्यान भावाने गुन्ह्याची कबुली दिली.
डॉक्टरला ताब्यात घेतले
पोलिस तपासात मृत सोमनाथ याच्याही मेडिकलचे शिक्षण झाले होते, मात्र त्याचे व्यसन अधिकच वाढले होते आणि त्यामुळे भावांमध्ये वारंवार वाद होत होते, हे उघड झाले.तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला लाकडी दांडका जप्त केला. संशयास्पद बाबी आढळून आल्याने पोलिसांनी डॉक्टर अशोक पाठक याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला, डॉक्टर अशोक पाठक याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहेत.