शंभर फूट दरीत ट्रक कोसळून चालकाचा मृत्यू ! धोकादायक वळणाने घेतला आणखी एक जीव

Published on -

माणिकदौंडी घाटात रविवारी संध्याकाळी भीषण अपघात घडला. बारामतीवरून छत्रपती संभाजीनगरकडे पुठ्ठा घेऊन जाणारा ट्रक घाट उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने तो थेट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक प्रवीण आजिनाथ मेंगुळे (वय ३९, रा. पिंपळगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमारे १०० फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील ट्रक चालकाला तातडीने पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हा अपघात या घाटातील पहिला नसून, वारंवार येथे अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. जानेवारी महिन्यात याच घाटात ऊस तोडणी कामगारांचा ट्रॅक्टर ट्रॉलीला अपघात झाला होता. त्यात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला तर पाच कामगार जखमी झाले होते. याशिवाय गेल्या महिन्यात पुन्हा एका ट्रॅक्टर ट्रॉलीच्या पलटीमुळे आठ कामगार गंभीर जखमी झाले.

या घाटामध्ये तीव्र उतार आणि अवघड वळणांमुळे वारंवार अपघात घडत आहेत. या घाटातील काही वळणांवर वाहनचालकांना नियंत्रण ठेवणे कठीण जाते. त्यामुळे हा भाग अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जात आहे. या ठिकाणी सुरक्षेसाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

या अपघातांच्या मालिकेमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवासी मोठ्या चिंतेत आहेत. धोकादायक वळण सुधारण्यासाठी आणि तीव्र उतार कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास अजूनही जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या अपघाताचा पुढील तपास पोलीस अमंलदार सुहास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घाटातील सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe