अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला आणि मृत्यू झाला ? हरेगाव प्रकरणात नवा ट्विस्ट!

Published on -

हरेगाव येथील अॅट्रॉसिटी प्रकरणातील फिर्यादी शुभम माघाडे आणि त्याचे सासरे भानुदास गायकवाड यांचा झालेला अपघाती मृत्यू हा केवळ योगायोग आहे की सुनियोजित कट, याचा सखोल तपास करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) आणि भीमशक्ती संघटनेने केली आहे.

रविवारी संध्याकाळी एस कॉर्नर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी नोंदवले असले, तरी अपघातस्थळी कोणत्याही वाहनाचा ठावठिकाणा न मिळाल्याने संशय अधिकच वाढला आहे.

रिपाइंच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना निवेदन सादर केले. यात आठ दिवसांच्या आत सत्य बाहेर आणण्याची मागणी करण्यात आली असून,

अन्यथा पोलिस ठाण्यावर तीव्र आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. भीमशक्ती संघटनेनेही तपासात पारदर्शकता ठेवावी, स्थानिक सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि अपघाताचा बनाव करून हत्या झाली का, याचा शोध घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, ऑगस्ट २०२३ मध्ये हरेगाव येथे कबूतर चोरीच्या संशयावरून मागासवर्गीय समाजातील चार युवकांना विवस्त्र करून झाडाला टांगून मारहाण करण्यात आली होती. या अमानवीय कृत्यावर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचा मुख्य फिर्यादी शुभम माघाडे हा वारंवार धमक्या आणि दबावाला तोंड देत होता. त्याच्यावर केस मागे घेण्यासाठी धमकावले जात होते, त्यामुळे त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूवर आता संशय घेतला जात आहे.

रिपाइं आणि भीमशक्तीच्या नेत्यांनी या घटनेच्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. अपघातस्थळी कोणतेही वाहन दिसले नाही, पोलिसांनाही स्थानिकांकडून ठोस माहिती मिळालेली नाही, आणि माघाडे याला पूर्वीपासून धमक्या दिल्या जात होत्या, या बाबी लक्षात घेता अपघाताचा बनाव रचून हत्या केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघात किंवा हत्या याचा वेगाने तपास व्हावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यात गाजलेल्या हरेगाव प्रकरणातील मुख्य फिर्यादीचा संशयास्पद मृत्यू ही पोलिसांसाठी मोठी कसोटी ठरणार आहे. जर हा अपघात नसेल आणि सुनियोजित कट असेल, तर त्यामागील सूत्रधारांना न्यायालयासमोर उभे करणे पोलिसांची जबाबदारी असेल. संपूर्ण घटनेचा निष्पक्ष तपास होऊन सत्य बाहेर यावे, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe