राज्याच्या अर्थसंकल्पात ‘आनंदाचा शिधा’ आणि ‘शिवभोजन थाळी’ योजनेकरिता कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात न आल्याने जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांवर संकट ओढवले आहे. ‘आनंदाचा शिधा’ योजनेच्या माध्यमातून दिवाळी, दसरा आणि गुढीपाडवा अशा सणांच्या वेळी गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात होत्या. याशिवाय, रोज हजारो गरीब आणि गरजू नागरिकांसाठी सुरू असलेली शिवभोजन थाळीही बंद होण्याच्या मार्गावर आहे.
नगर जिल्ह्यात ६ लाख ९१ हजार ११० लाभार्थी ‘आनंदाचा शिधा’ योजनेत समाविष्ट आहेत. या योजनेअंतर्गत रेशन कार्डधारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणाडाळ आणि एक लिटर पामतेल देण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत पाच वेळा या शिध्याचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, यंदा गुढीपाडवा जवळ येऊनही शिधावाटपाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

ठाकरे सरकारच्या काळात सुरू झालेल्या शिवभोजन केंद्रांना देखील अर्थसंकल्पात स्थान मिळालेले नाही. जिल्ह्यात ३९ शिवभोजन केंद्रे कार्यरत असून, यातील बहुतांश केंद्रचालकांचे अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने ही केंद्रे लवकरच बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे गरीब आणि गरजू नागरिकांसाठी मोठे संकट उभे राहिले आहे.
नगर शहर आणि ग्रामीण भागात दररोज एकूण ४ हजार ५२५ थाळ्यांचे वाटप होते. शहरातील २० केंद्रांतून २ हजार ३७५ थाळ्या आणि ग्रामीण भागातील १९ केंद्रांतून २ हजार १५० थाळ्यांचे वितरण केले जाते. ही सेवा थांबल्यास गरीब नागरिकांसाठी रोजच्या जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
या दोन्ही योजनांना अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसल्याने पुढे काय होणार, याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही. केंद्र चालकांना अनुदान कधी मिळणार आणि शिध्याचे वाटप होणार की नाही, याबद्दलही साशंकता आहे. योजनांची अचानक होणारी बंदी गरीब, गरजू आणि रेशन कार्डधारकांसाठी मोठा धक्का ठरू शकते. त्यामुळे सरकारने त्वरित भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली जात आहे.