भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटरसायकलपैकी एक असलेल्या Hero Splendor Plus ला आता नवीन अपडेट मिळाले आहे. कंपनीने या बाईकमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि नवीन रंग पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
1994 पासून भारतीय बाजारात लोकप्रिय असलेल्या या बाईकचा लूक आता आणखी स्टायलिश आणि सुरक्षित झाला आहे. मात्र, या अपग्रेडमुळे किंमतीत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.

Hero Splendor Plus हीरो मोटोकॉर्पसाठी विक्रीच्या बाबतीत महत्त्वाची बाईक आहे. कंपनीने 1994 मध्ये CD 100 आणि Sleek या बाईकच्या जागी Splendor लाँच केली होती.
लॉन्चनंतर लगेचच ही बाईक भारतीय ग्राहकांच्या गळ्यातील ताईत बनली आणि आजही ती देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकमध्ये आघाडीवर आहे. तिचे इंधन कार्यक्षम इंजिन आणि मजबूत बांधणी यामुळे ही बाईक सामान्य ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
Hero Splendor Plus च्या नव्या 2025 मॉडेलमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे फ्रंट डिस्क ब्रेक. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Splendor Plus च्या सर्व व्हेरिएंटमध्ये ड्रम ब्रेक दिले जातात.
मात्र, नवीन मॉडेलमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि मागील ड्रम ब्रेक असणार आहे. हा अपडेट सर्व व्हेरिएंटमध्ये असेल की फक्त टॉप व्हेरिएंटसाठी असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, डिस्क ब्रेकमुळे ब्रेकिंग पॉवर सुधारेल आणि बाईक जास्त सुरक्षित होईल.
यावेळी Splendor Plus मध्ये व्हिज्युअल अपडेट्सदेखील मिळाले आहेत. नव्या मॉडेलसाठी दोन नवीन रंग पर्याय उपलब्ध होतील. यामुळे बाईकला स्पोर्टी लूक मिळतो. लाँचवेळी आणखी काही नवीन रंग पर्याय समोर येऊ शकतात. यामुळे Splendor Plus आता जास्त मॉडर्न आणि आकर्षक दिसणार आहे.
Hero Splendor Plus हे इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखले जाणारे मॉडेल आहे. नव्या अपडेटनंतरही या बाईकच्या इंजिनमध्ये कोणताही यांत्रिक बदल करण्यात आलेला नाही. OBD-2B मानकानुसार हे इंजिन अपडेट केले जाईल, मात्र त्याची बेसिक स्पेसिफिकेशन्स त्याच राहतील.
यात 97.2cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे 7.9 bhp ची पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते. बाईक चार-स्पीड गिअरबॉक्स सोबत येते, ज्यामुळे गियर शिफ्टिंग स्मूथ राहते आणि इंधन कार्यक्षमतेत कोणताही परिणाम होत नाही.
सध्या Hero Splendor Plus च्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ₹77,176 पासून सुरू होते. मात्र, फ्रंट डिस्क ब्रेक आणि नवीन रंग पर्यायांमुळे किंमतीत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय ग्राहकांसाठी बाईकच्या किंमती अत्यंत संवेदनशील असतात आणि कंपनीला याचा विचार करूनच किंमती निश्चित कराव्या लागतील.