मुंबई, १३ मार्च २०२५: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’ना सध्या मिळणारे १५०० रुपये वाढवून २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या निर्णयाचा कुठेही उल्लेख नसल्याने, सभागृहात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली.
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे या विषयावर समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे योग्य वेळी याबाबत निर्णय घेतील, असे सांगून विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

विरोधक आमदार वरुण सरदेसाई आणि रोहित पवार यांनी सभागृहात विचारले की, ‘लाडक्या बहिणींना २१०० रुपयांची वाढीव रक्कम देण्याची घोषणा प्रत्यक्षात कधी येणार?’ यावर मंत्री तटकरे यांनी थेट उत्तर देण्याऐवजी,
या योजनेच्या लाभार्थींची संख्या गेल्या महिन्यापासून वाढल्याचे स्पष्ट केले. सध्या ही संख्या २ कोटी ४७ लाखांच्या वर गेली असून, यापूर्वी ही संख्या २ कोटी ३३ लाख ६४ हजार इतकी होती.
दरम्यान, विरोधकांनी यावरून सरकारवर महिलांची फसवणूक केल्याचा आरोप करत सभागृहातून बहिष्कार टाकला.
मात्र, तटकरे म्हणाल्या, “महायुती हे एकमेव सरकार आहे जे महिलांना दरमहा १५०० रुपये नियमितपणे देते. ही योजना चालूच राहील, तसेच लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही. २१०० रुपयांची वाढीव रक्कम देण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील.”