१३ मार्च २०२५ देवळाली प्रवरा : डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यामुळे या कारखान्याचे सभासद अपूर्ण शेअर्स पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यालयात चकरा मारत होते परंतु प्रशासन अधिकारी कार्यालयाला कुलूप लावून, फोन बंद करून बसले होते.त्यामुळे प्रशासन अधिकारी ठराविक सभासदांचेच शेअर्स पूर्ण करत आहेत असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.
माजी मंत्री तनपुरे यांनी कारखान्याच्या केंद्रीय कार्यालयाला भेट दिली पण त्यावेळी शेअर्स पूर्ण करण्यासाठीचे कार्यालय बंद असल्याचे त्यांना दिसले.माजी मंत्री तनपुरे म्हणाले की,कारखाना प्रशासनाकडून तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून पदाचा दुरुपयोग केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अधिकारी फक्त मर्जीतल्या सभासदांचे अपूर्ण शेअर्स पूर्ण करून घेत असून,अन्य सभासद यापासून वंचित रहावे म्हणून हा डाव मांडल्याचे दिसत आहे. प्रशासनातील अशा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असून यावेळी कारखाना कृती समितीचे अमृत धुमाळ, अरुण कडू, हर्ष तनपुरे, सुखदेव मुसमाडे, प्रकाश भुजाडी, नंदकुमार तनपुरे, अशोक खुरुद, प्रमोद कदम, कृष्णा मुसमाडे, संजय पोटे, अरुण दूस, सुरेश धुमाळ, अनिल इंगळे, हरिभाऊ खामकर आदी उपस्थित होते.