अकोले मधील घटना : शाळेत गेलेले चिमुरडे हरवले आणि थोड्याच वेळात…

Published on -

१३ मार्च २०२५ अकोले : शहराजवळ माळीझाप उंचखडक आसपासच्या ओढ्याजवळ नवनाथ मंडलिक यांच्या शेतात काम करणाऱ्या मजूर आदिवासी जोडप्याच्या चार मुलांचे अपहरण झाले आहे अशी अफवा पसरली होती पण थोड्याच वेळात त्या ठिकाणी एका वाटसरू मोटरसायकल स्वाराने या चिमुकल्या भावंडांना सुखरूप त्यांच्या आई-वडिलांच्या हवाली केले.त्यामुळे ही भावंड नेमके हरवले होते की, त्यांचा अपहरणाचा प्रयत्न झाला होता याबद्दल अधिक तपास पोलिस करत आहेत.

औरंगपूर ते विठे रस्त्यावरील दुकानांच्या सीसीटीव्हीत हे चार भावंडं रमतगमत रस्त्याने चालताना दिसत आहेत.घाबरलेल्या मुलीने अनोळखी मोटारसायकलवाल्याने नेले व दूर सोडून दिले असे सांगीतले, पण ती आई-वडिलांच्या भीतीमुळे पोटी असे म्हणतेय का कि खरच त्यांचं अपहरण झालं होत ? हे तपासात कळेलच पण सध्या संशयित मोटारसायकलस्वार अथवा व्यक्ती सीसीटीव्हीत दिसून येत नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

माळीझाप प्राथमिक शाळेत ही चिमुकली इयत्ता तिसरीत शिकत असून ती दररोज आपल्या भावंडांबरोबर अंगणवाडीत व शाळेत येते.सोमवारी आई-वडील सकाळीच कामासाठी घराबाहेर गेले होते तेव्हा चिमुकली मुलगी हातात कपड्याची पिशवी आणि आपल्या भावंडांना घेऊन माळीझाप गावाच्या दिशेने निघाली.

दुपारी आई-वडील घरी आल्यावर त्यांना घरात मुले दिसली नाहीत म्हणून त्यांनी शाळेत तपास केला, तर शाळेत मुले नव्हती.म्हणून मुलांचे अपहरण झाल्याची खबर वाऱ्यासारखी अकोल्यात पसरली.मुलांच्या पालकानीं आणि गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली.अकोले-राजूर रस्त्यावरील पुलवाडी-विठे घाट दरम्यान एका वाटसरूला ही मुले दिसली तेव्हा त्याला अपहरणाची खबर कळली होती. लगेच त्याने ही मुले आपल्या गाडीवरून माळीझाप येथे नेऊन मुलांना त्यांच्या घरी सोडले.दरम्यान, अपहरण झाले की मुले भरकटली याचा तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe