१३ मार्च २०२५ अहिल्यानगर : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मुलांच्या ३५६ टंग टाय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बोबडी बोलणारी मुले स्पष्ट बोलू लागली आहेत. याशिवाय या योजनेतून गेल्या वर्षभरात ० ते १८ वयोगटातील एकूण ८ लाख ८ हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली त्यात ६० हजार ६२७ जण किरकोळ आजारी आढळले, तर २४७ जणांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
मुलांच्या आरोग्य संवर्धन व विकासासाठी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यात आढळून आलेल्या आजारांवर वेळीच उपचार करणे व आजारांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविला जातो. मुला-मुलींची आरोग्य तपासणी केली जाते. त्यात आढळलेल्या आजारांवर या योजनेतून मोफत उपचार केले जातात.

अशी होते अंमलबजावणी
प्रत्येक शैक्षणिक वर्षात अंगणवाडी बालकांसाठी दोनदा, तर शालेय विद्यार्थ्यांसाठी एकदा आरोग्य तपासणीचे आयोजन केले जाते.यातील किरकोळ आजाराचे निदान झालेल्या बालकांवर शाळेतच उपचार केले जातात, तर गंभीर आजाराचे निदान झालेल्या बालकांवर जिल्हा रुग्णालय अथवा महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांत पुढील उपचार करून त्यांचा पाठपुरावा केला जातो. ज्या बालकांमध्ये आजारांचे निदान होते त्यांच्यावर पालकांच्या परवानगीने मोफत वैद्यकीय उपचार केले जातात.
८ लाख विद्यार्थ्यांची तपासणी
अहिल्यानगर जिल्ह्यात एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत ० ते १८ वयोगटातील एकूण १० लाखपैकी ८ लाख ८ हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील एकूण २४७विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यात आरोग्य पथके कार्यरत
जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात आरोग्य विभागाची पथके कार्यरत असून, प्रत्येक पथकात एक-एक पुरुष व महिला वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता व परिचारिका अशा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. जन्मतःच व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासास विलंब व इतर आजार यांचे निदान व उपचार या मोहिमेत केले जातात.
वर्षभरातील तपासणी आढावा
तपासलेले ० ते १८ वयोगटातील
विद्यार्थी: ८ लाख ८ हजार ७२७
तपासलेल्या शाळा: ३७८४
तपासलेल्या अंगणवाडी : ५१६३
किरकोळ आजारी : ६० हजार ६२७
शस्त्रक्रिया: ९४७
हृदय शस्त्रक्रिया : १०६
कोक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया : ११
हाडाच्या शस्त्रक्रिया: ६८
टंक टाय शस्त्रक्रिया: ३५६
कानाच्या शस्त्रक्रिया: ३२७
डोळ्याच्या शस्त्रक्रिया: ३४