अहिल्यानगर ब्रेकिंग : अहिल्यानगर मधील विविध खुनांच्या घटनांनी जिल्हा आधीच हादरलेला आहे. आता श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी शिवारात एका विहिरीत अर्धवट अवस्थेतला मृतदेह आढळून आलाय. या मृतदेहाचे मुंडके, दोन्ही हात आणि एक पाय तोडलेले असून, प्राथमिक तपासात तो मृतदेह अंदाजे वीस वर्षीय तरुणाचा असेल असा प्राथमिक अंदाज आहे. बुधवारी (दि. 12) सकाळी हा मृतदेह आढळून आला. सदर तरुणाचा आधी खून करण्यात आला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी विहिरीत मृतदेह टाकला असण्याची शक्यता सध्या पोलिसांनी व्यक्त केलीये.
या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारी आदींसह पोलीस घटनास्थळी पोहोचतोय घटनेच्या मागोवा घेत तपासाची चक्रे फिरवण्यास सुरवात केली. दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला असावा? मृत तरुणाचा गुन्हेगारी विश्वाशी संबंध होता का? वैयक्तिक वादातून या तरुणाचा खून झालाय का? या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

दरम्यान, दाणेवाडीचा शिरुर येथील सीटी बोरा महाविद्यालयाचा एक वीस वर्षांचा तरुण मागील काही दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. हा तोच आहे का इतर कोणी आहे या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत. परंतु या मृतदेहाला मुंडकेच नसल्याने ओळख पटवणे मुश्किल झाले आहे.मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात विविध गुन्हेगारी घटना घडत आहेत. नगर शहरातील खुनाची घटना ताजी असतानाच आता श्रीगोंदेतील या खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या घटनेच्या पुढील तपास करत आहेत.