दोन दिवस दोन मंदिरात केली चोरी अन मुद्देमाल विक्रीसाठी निघाले अहिल्यानगरला मात्र पोहोचले भलत्याच ठिकाणी

Published on -

अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील काकडवादी येथील महालक्ष्मी मंदिरासह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील देवीच्या मंदिरात चोरी करून देवाचे दागिने विक्री करण्यासाठी काळया रंगाच्या फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार (एमएच ०४-एचएफ१६६१) मधुन संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे चोरट्यांची टोळी चालली होती. मात्र पोलिसांना याबाबत आगोदरच माहिती मिळाल्याने अहिल्यानगरला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या मुसक्या आवळल्या.

याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मीमाता मंदिरात दि.८ मार्च २०२५ रोजी चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा व गाभाऱ्याचे कुलुप तोडुन देवीचे चांदीचे टोप, चांदीचे टोपामधील सोन्याचे पान, मूर्तीच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र व इतर सोन्याचे दागीने असा एकूण २४ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल चेरून नेला होता. याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना याबाबत तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आहेर यांनी सपोनि हेमंत थोरात व पोलीस अंमलदार सागर ससाणे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे यांचे पथक तयार करुन त्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या होत्या.

पथकाने गुन्हयाच्या तपासात घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे (रा.हिवरगाव पावसा, ता.संगमनेर) याने त्याच्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान सदरचे आरोपी अहिल्यानगर जाणार असल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ लोणी ते कोल्हार रोडवर सापळा लावला असताना संशयीत कार मिळून आली. तिला रोडच्या बाजुला घेत असताना कारमधुन तीन इसम पळून जाऊ लागले. मात्र पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्यांना व कारमधील आणखी तीन अशा एकुण सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे सुयोग अशोक दवंगे (वय २१, रा.हिवरगाव पावसा, ता.संगमनेर जि.अहिल्यानगर), संदीप किसन साबळे (वय २३, रा.पाचपट्टावाडी, ता.अकोले, जि.अहिल्यानगर), संदीप निवृत्ती गोडे (वय २३, रा.सोमठाणे, ता.अकोले, जि.अहिल्यानगर), अनिकेत अनिल कदम (वय २१, रा.टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे), दिपक विलास पाटेकर (वय २४, रा.टिटवाळा, ता.कल्याण, जि.ठाणे), सचिन दामोदर मंडलीक (वय २९, रा.संगमनेर, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर) असे असल्याचे सांगीतले.

पथकाने त्यांची अंगझडती घेतली असता २६ लाख १२ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल त्यात १९९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागीने, १६६५ ग्रॅम वजनाचे चांदीचे विविध दागीने (पान, मुकूट, मणी, नेकलेस, कंबर पट्टा, चैन, नथी, मूर्ती, पादुका, छत्री, पंचारती इ.), ३ मोबाईल व एक फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दवंगे याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्यासाथिदारांसह केला असल्याचे सांगत दोन दिवसांपूर्वीच सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदीर व सिन्नर येथील पुणे ते नाशिक रोडवरील वज्रेश्वरी मंदीरात चोरी केल्याची माहिती दिली. तसेच चोरी केलेला मुद्देमाल हा सचिन दामोदर मंडलीक याच्या मध्यस्थीने विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती सांगीतली. या सर्वांना मुद्देमालासह पुढील तपासकामी संगमनेर तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe