मंत्री नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा: ‘या’ संघटनेचे थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे

Published on -

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले मंत्री नितेश राणे यांनी संविधानिक पदावर असताना अत्यंत बेजबाबदार खोटं वक्तव्य करून धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक एकमतेला धक्का पोहोचला असुन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मिती प्रक्रियेमध्ये त्यांच्या सैन्यात एक ही मुस्लिम नव्हता हे वक्तव्य अत्यंत खोटं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा मुस्लिम विरुद्ध हिंदू असा होता या बेजबाबदार वक्तव्याने धार्मिक आणि सामाजिक द्वेष पसरून राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेवून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष सोमनाथ कराळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे, वास्तवात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती करताना जे सैन्यदल उभे केले होते त्यामध्ये १८ पगड जाती मधील सर्व जाती धर्मीय लोक सैन्य म्हणून भरती केले होते तर सैनिक ते सरदार या अनेक पदावर सर्व जातीय व धर्मीय लोक काम करत होते. स्वराज्याचे आरमार, तोफखाना, संरक्षण व्यवस्था या विभागात अनेक मुस्लिम असल्याचे ऐतिहासिक पुराव्याने सिद्ध झालेले आहे. एवढेच नाही तर इतिहासातील युद्ध तह, व्यापार, देवाण घेवाण यावरून हा लढा कोणत्या एका जाती अथवा धर्माविरुद्ध नव्हता तर तो राजकीय म्हणजेच स्वराज्य निर्मितीसाठी होता. कोणताही धार्मिक अभिनेवेशने छत्रपती शिवाजी महाराजांनी एखाद्या धर्माला लक्ष केल्याचे संपूर्ण इतिहासात आढळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू धर्माचा अभिमान नक्की होता मात्र हा अभिमान बाळगताना दुसऱ्या धर्मांचा कधीही द्वेष केल्याचे इतिहासात दिसलेले नसून मंत्री नितेश राणे हे जाणीवपूर्वक देशात व राज्यात धार्मिक द्वेष पसरून जातीय व धार्मिक दंगली घडून राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहोचवत असल्याचे नमूद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe