१४ मार्च २०२५ नगर : संभाजी ब्रिगेडच्या नावाबद्दल शिवधर्म फाउंडेशन १८ मार्च पासून पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे तसेच २८ मार्च रोजी अहिल्यानगरमध्ये मोर्चा काढला जाणार आहे अशी माहिती शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी दिले आहे.
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर पुत्र तसेच स्वराज्याचे दूसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महारांजांच्या शौर्याची,त्यागाची व धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची ख्याती संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.हिंदू धर्मरक्षणार्थ दिलेल्या योगदानामुळेच रयतेने त्यांना धर्मवीर ही उपाधी बहाल केली आहे पण संभाजी ब्रिगेड ही संघटना आणि पक्ष सातत्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील करोडो शिवभक्त आणि संभाजी महाराजांवर निस्सीम श्रद्धा असलेल्या जनतेच्या भावना यामुळे दुखावल्या जात आहेत.

तसेच संभाजी ब्रिगेड या संघटनेचे नाव ‘संभाजी’ या एकेरी नावाने पसरल्यामुळे महाराष्ट्रातल्या लाखो नागरिकांकडून अज्ञातपणे किंवा नकळतपणे छत्रपती संभाजी महाराजांचा आणि त्यांच्या नावाचा अपमान केला जातो.म्हणून महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मिता धोक्यात येऊ लागली आहे.संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव लवकरात लवकर बदलावे तसेच नाव बदलण्यास उशीर झाला किंवा त्यांनी नाव बदलण्यास नकार दिला, तर या संघटना व पक्षांची नोंदणी तत्काळ रद्द करण्यात यावी.
तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर पावले उचलून योग्य भूमिका घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर योग्य ती कारवाई करायला पाहिजे अशी मागणी दीपक काटे यांच्याकडून होत आहे.शिवधर्म फाउंडेशन कडून केल्या जाणाऱ्या या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे आणि त्यांनी असे सांगितले कि, छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत त्यामुळे त्यांचा अपमान कोणीही खपवून घेणार नाही.प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलायला हवीत.
शिवधर्म फाउंडेशनने या घटनेचा तीव्र निषेध केला असून या संघटनांच्या आणि पक्षाच्या नावांमध्ये तातडीने बदल करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी पुणे येथे १८ मार्च, सातारा : २० मार्च, कोल्हापुर २१ मार्च, सांगली २९ मार्च, सोलापुरः २५ मार्च, अहिल्यानगर २८ मार्च, जालना : २९ मार्च, छत्रपती संभाजीनगर ७ एप्रिल, नाशिक ९ एप्रिल, ठाणे, रायगड ११ एप्रिल रोजी आंदोलन करणार असल्याचे दीपक काटे यांनी सांगितले.