१४ मार्च २०२५ संगमनेर : गालफुगी होणे किंवा गालगुंड हा लाळेच्या ग्रंथीचा संसर्गजन्य आजार आहे.हा आजार पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे होत असतो.ही लाळ ग्रंथी कानाच्या खाली आणि कानाच्या समोरच्या भागात असते. या आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे शिंका, खोकला किंवा लाळेतून आणि स्पर्शातून विषाणूचा संसर्ग निरोगी मुलांना होत असतो.हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे.
हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूंमधील वसंत ऋतू हा आजारांच्या संक्रमणाचा काळ असतो या ऋतूत हवामान उष्ण असल्यामुळे लहान मुलांमध्ये गालफुगीचा त्रास जास्त उद्भवत असतो.गालफुगी छोट्या मुलापासून ते मोठ्या मुलांपर्यंत कोणत्याही मुलामुलींना होऊ शकते.शाळकरी मुलामुलींमध्ये गालफुगी होण्याचे प्रमाण जास्त असते.हा संसर्गजन्य आजार आहे म्हणून पालकांनी त्यांच्या पाल्यांची नीट काळजी घ्यावी.

लसीकरण हाच प्रभावी उपाय
आजाराला थांबवण्यासाठी ‘एमएमआर’ (गोवर, गालगुंड आणि रुबेला) ही लस बाळाला नवव्या आणि पंधराव्या महिन्यांत द्यायला पाहिजे कारण लसीकरण करणे हाच गालफुगीवर अत्यंत प्रभावी उपाय आहे. प्रत्येक पालकांनी त्यांच्या बालकांना बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘एमएमआ’चे लसीकरण करून घ्यावी.
लाळग्रंथी सूजते, गाल फुगून हनुवटी दुखते
गालफुगी हा लाळेच्या ग्रंथीचा संसर्ग आहे म्हणून हि लाळग्रंथी सूजते,गाल फुगून हनुवटी दुखते.लाळेच्या ग्रंथीला सूज येते,ती सूज त्रासदायक असते.तसेच काहींना ताप, डोकेदुखी, थकवा, भूक मंदावणे, उलटी अशी लक्षणे दिसून येतात,काहींना कमी-अधिक प्रमाणात त्रास होतो.जेवण करताना त्रास होतो.एका बालकापासून इतरही बालकांना त्याचा संसर्ग होतो.
औषध घेतल्यावर विश्रांती आवश्यक
आजाराची लक्षणे दिसताच मुलांना एकमेकांच्या संपर्कात येऊ देऊ नका, हा आजार झाल्यावर तो पूर्णपणे बरा होईपर्यंत मुलांना आठ दिवस शाळेत पाठवू नका. उपचार करण्यासाठी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.ताप आल्यानंतर पॅरासिटेमॉल हे औषध देऊन विश्रांती घेऊ द्या.मुलांना त्यांच्या जेवणात द्रव पदार्थ द्या.कोमट पाणी प्यायला द्या.चाऊन खायला लागणारे अन्न देणे टाळा.
गालफुगीचा त्रास होत असलेल्या मुलांना त्यांचे पालक रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन येत आहेत. हा आजार विषाणूमुळे होतो. बाळ नऊ महिन्यांचे असताना पहिला डोस, तसेच दुसरा बुस्टर डोस बाळ १५ महिन्यांचे झाल्यानंतर देतात. बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ही लस देणे अत्यावश्यक आहे. – डॉ. संदीप होन, बालरोगतज्ज्ञ, संगमनेर