सणासुदीच्या काळात बाजारात भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री वाढते, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न-औषध प्रशासनाने जानेवारीपासून विशेष पथक तैनात केले आहे. नगर जिल्हा दूध उत्पादनात आघाडीवर असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दूध आणि त्याचे उपपदार्थ खपतात.
म्हणूनच प्रशासनाने ग्राहकांना वितरित केल्या जाणाऱ्या दुधाचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी सुरू केली आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीच्या वाढत्या संशयामुळे अन्न-औषध प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

१ जानेवारी ते १३ मार्च या कालावधीत प्रशासनाने अहिल्यानगर आणि जिल्ह्यातून एकूण १२७ नमुने ताब्यात घेतले आहेत. या तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांपैकी ७८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये कोणतीही भेसळ आढळलेली नाही.
अन्न-औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोपान इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित ३८ नमुने सध्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी प्रलंबित आहेत. याशिवाय, दुधापासून बनवण्यात आलेल्या पनीरचे सात नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत, परंतु त्यांचेही प्रयोगशाळीय परीक्षण अद्याप बाकी आहे.
नगर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात प्रशासनाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे. जर तपासणीसाठी उर्वरित नमुन्यांमध्ये भेसळीचे प्रमाण आढळले, तर संबंधित दूध उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
अन्न-औषध निरीक्षक राजेश बडे यांनी याबाबत माहिती देत जनतेला सतर्क राहण्याचे आणि केवळ प्रमाणित दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.