Numerology : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रालाही मोठे महत्त्व आहे. जन्मतारखेवरून व्यक्तीच्या जीवनातील अनेक पैलू जाणून घेता येतात. मूलांक हा त्यातील महत्त्वाचा घटक आहे. अंकशास्त्रामध्ये १ ते ९ या संख्यांवरून व्यक्तीच्या स्वभावाचे आणि भविष्यातील घडामोडींचे आकलन करता येते.
आज आपण अशा मूलांकाविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्यावर धनसंपत्तीबरोबर मान-सन्मानाचीही कृपा असते.मूलांक ६ असलेले लोक केवळ पैसा नाही तर मान-सन्मान आणि लोकप्रियतेच्या बाबतीतही भाग्यवान असतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावशाली असते आणि समाजात त्यांना विशेष स्थान मिळते. जीवनभर संपत्ती आणि यश त्यांच्या सोबत राहते.

संपत्ती आणि यशाचे प्रतीक
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. या मूलांकाचा अधिपती शुक्र ग्रह आहे. शुक्र हा सौंदर्य, ऐश्वर्य, वैभव आणि समृद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे या मूलांकाच्या लोकांना आयुष्यात धन, संपत्ती आणि उच्च स्थान मिळते. हे लोक अत्यंत समृद्ध जीवन जगतात आणि बहुतेक वेळा श्रीमंतीसह राजेशाही थाटात आपले जीवन व्यतीत करतात.
आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे धनी
या मूलांकाचे लोक सहज लोकांना आकर्षित करू शकतात. त्यांच्याकडे एक विशेष प्रकारचे प्रभावी व्यक्तिमत्त्व असते, ज्यामुळे लोक सहज त्यांच्याकडे खेचले जातात. त्यांची बोलण्याची शैली, आत्मविश्वास आणि देहबोली हे सगळेच प्रभावी असते. त्यामुळे ज्या ठिकाणी हे जातात, तिथे स्वतःकडे सहज लक्ष वेधून घेतात.
इतरांना मदत करणारे
मूलांक ६ असलेले लोक स्वभावाने मदतीसाठी तत्पर असतात. ते गरजू व्यक्तींना हातभार लावण्यास नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे समाजात त्यांना मोठा आदर मिळतो. त्यांचा दयाळूपणा आणि प्रेमळ स्वभाव हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास वैशिष्ट्य आहे.
रोमँटिक आणि लक्झरी प्रेमी
हे लोक लक्झरी जीवनशैलीला पसंती देतात. त्यांना महागड्या वस्तू, आलिशान घर, आकर्षक गाड्या आणि चांगल्या जीवनशैलीची आवड असते. त्याचबरोबर हे लोक खूप रोमँटिक आणि प्रेमळ असतात. जोडीदारावर त्यांचे निस्सीम प्रेम असते आणि त्यांच्यासोबत एक सुंदर जीवन घालवतात. हे लोक विश्वासू आणि समजूतदार जोडीदार असतात.