१५ मार्च २०२५ पंढरपूर : शिर्डी येथे जगभरातील लोक येत असतात. त्यामुळे सर्व ठिकाणी वारकरी साहित्याचा प्रसार व्हावा, यासाठी यंदाचे वारकरी साहित्य परिषदेचे १३ वे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन शिर्डी येथे २२ आणि २३ मार्च रोजी होणार आहे. या संमेलनासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर हे संमेलनाध्यक्ष व स्वागताध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील असणार आहेत, अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी
सांगितले.
पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत विठ्ठल पाटील बोलत होते. यावेळी ह.भ.प. संजय महाराज देहूकर उपस्थित होते. पुढे पाटील म्हणाले, संत साहित्याची माहिती सर्वांना समजावी, तसेच संत साहित्याचा प्रसार व्हावा, त्याचे अनुयायी वाढावेत, मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे संमेलन गेल्या बारा वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे. या साहित्य संमेलनासाठी १५ हजार भाविक उपस्थित राहणार असून, पुढील काळात देशातील सर्व राज्यांमध्ये साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे.

संत साहित्याचा प्रचार करणाऱ्यांचा सन्मान
या संमेलनामध्ये नऊ राज्यांतील संत साहित्याचे प्रचार करणारे महाराज मंडळींचा सन्मान केला जाणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.संत साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी पंढरपूर येथे केले.