अहिल्यानगर: प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत, श्रीजी प्रोसेस इंजिनियरिंग वर्क्स प्रा. लि. चे मालक मा. श्री दिनेश चंद्रा अग्रवाल यांच्या वतीने अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील 25 क्षयरुग्णांना दत्तक घेण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश क्षयरुग्णांना पोषण आहार आणि आवश्यक आधार प्रदान करणे हा आहे, जेणेकरून त्यांचे लवकर आणि संपूर्ण आरोग्य पुनर्प्राप्ती शक्य होईल.
गुरुवार, दि. 13 मार्च 2025, रोजी महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालयात या क्षयरुग्णांना पुरक कोरडा पोषण आहार किट वितरित करण्यात आला. या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मा. यशवंत डांगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतिश राजुरकर, श्रीजी प्रोसेस इंजिनियरिंग वर्क्स प्रा. लि. चे मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेशन मा. श्री. कैलास पाटील, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. साहिल शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय शेळके आणि क्षयरोग विभागातील कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमातील महत्त्वाचे मुद्दे:
क्षयरोगाचा सामना पोषणाच्या मदतीने:- डॉ. सतिश राजुरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, क्षयरुग्णांनी नियमित औषधोपचारासोबत पुरक पोषण आहार घेतल्यास त्यांना जलद बरे होण्यास मदत होते. पोषण आहाराने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर वेगाने बरे होते.
श्रीजी प्रोसेस इंजिनियरिंग वर्क्स प्रा. लि. चा सामाजिक उपक्रम:- मा.श्री दिनेश चंद्रा अग्रवाल आणि मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेशन मा. श्री कैलास पाटील यांनी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून हा उपक्रम हाती घेतला आहे. क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांच्या आरोग्य पुनर्स्थापनेस हातभार लावण्याचा निर्णय त्यांच्या कंपनीने घेतला आहे.”निक्षय मित्र” उपक्रमामध्ये सहभागाचे आवाहन:- महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मा. यशवंत डांगे यांनी औद्योगिक संस्थांनी, सामाजिक संघटनांनी आणि दानशूर व्यक्तींनी “निक्षय मित्र” म्हणून नोंदणी करून या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. त्यांनी श्रीजी प्रोसेस इंजिनियरिंग वर्क्स प्रा. लि. च्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत याला प्रतिसाद देण्यासाठी अधिकाधिक संस्था आणि व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे सांगितले.
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान:- प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे, जो 2025 पर्यंत भारत टीबीमुक्त करण्याच्या उद्देशाने राबवला जात आहे. या योजनेअंतर्गत क्षयरुग्णांना मोफत उपचार, पोषण आहार, मानसिक आधार आणि आरोग्य सेवा पुरवण्यात येतात. “निक्षय मित्र” ही या योजनेतील एक संकल्पना असून, सामाजिक संस्था, कंपन्या, किंवा व्यक्तींना क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांच्या पोषण आणि उपचारासाठी मदत करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
श्रीजी प्रोसेस इंजिनियरिंग वर्क्स प्रा. लि. च्या सामाजिक बांधिलकीचा आदर्श:- या उपक्रमाच्या माध्यमातून श्रीजी प्रोसेस इंजिनियरिंग वर्क्स प्रा. लि. ने सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श निर्माण केला आहे. भविष्यात अधिकाधिक औद्योगिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी समाजातील आरोग्य प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कोट
या सकारात्मक सामाजिक उपक्रमाबद्दल मा. श्री दिनेश चंद्रा अग्रवाल, मा. श्री कैलास पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि आभार मानण्यात आले. असे अनेक उपक्रम समाजात सुरू राहावेत यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मा. यशवंत डांगे यांनी केले.