अहिल्यानगर : नगर शहरातील अप्पू हत्ती हा तसा ऐतिहासिकच. जवळपास ४३ वर्षांपासून हा हत्ती नगरकरांची ओळख आहे. सावेडीतून दिल्लीगेट वा सर्जेपुराकडे जाताना सिव्हील हॉस्पिटलजवळील चौकात असलेला एक पाय उंचावून उभा असलेला हत्ती अर्थात अप्पू हत्ती पुतळा हा जिल्ह्यात प्रसिद्ध. परंतु आता हा ऐतिहासिक अप्पू हत्ती ४३ वर्षानंतर आता इतिहास जमा होणार आहे. महापालिकेद्वारे हा अप्पू हत्ती पुतळा काढून टाकला जाणार असून, तेथे भव्य सर्कल करून ते सुशोभित केले जाणार असल्याची माहिती समजली आहे.
४३ वर्षांपूर्वी १९८२ मध्ये भारतात प्रथमच झालेल्या एशियाड गेम्ससाठी (आशियाई क्रीडा स्पर्धा) तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हात एक पाय उंचावून फुटबॉल खेळतानाचे हत्तीचे पिल्लू शुभंकर म्हणून घेण्यात आले होते. त्याच बोधचिन्हाच्या आधारे नगरमध्ये अप्पू हत्ती पुतळा करून चौकात उभारण्यात आला होता. मधल्या काही काळात हा पुतळा काढून टाकण्यात आला होता. मात्र, त्यावेळी काही संस्कृती प्रेमींनी विरोध केल्याने तो पुन्हा बसवण्यात आला होता.आता पुन्हा हा पुतळा हटवून तेथे भव्य सर्कल करण्याचे मनपाचे नियोजन आहे. शहराचे वैभव म्हणून या अप्पू हत्ती पुतळ्याची ओळख आहे.

सावेडीकडून सर्जेपुरा वा दिल्लीगेटकडे जाताना सिव्हील हॉस्पिटल सोडले की अप्पू हत्ती लांबूनच दिसतो. दिल्लीगेट वा सर्जेपुरातून सावेडीकडे येतानाही हा हत्ती दिसतो. त्याच्या अस्तित्वामुळेच या चौकाला अप्पू हत्ती चौक असे नाव पडले आहे. १९८२मध्ये देशात पहिल्यांदा झालेल्या एशियाड गेम्स स्पर्धेच्या बोधचिन्हावर शुभंकर-हत्ती पिल्लू अप्पू हत्ती म्हणून साकारले होते व तीच आठवण कायम राहावी म्हणून या हत्तीची प्रतिकृती नगरमध्ये साकारली होती. ती आता कायमस्वरुपी विस्मरणात जाण्याची चिन्हे आहेत. नगरमधील सांस्कृतिक प्रेमी मंडळी यावर काय भूमिका घेणार हे देखील पाहणे गरजेचे आहे. या ऐतिहासिक पुतळ्याचे पुनर्वसन होणार, जतन होणार की आणखी काही याबाबत येणार काळच उत्तर देईल.