Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला येत्या काही दिवसांनी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याची भेट मिळणार आहे. 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गाचा सध्या 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू आहे. समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबई दरम्यान विकसित केला जात असून सध्या या महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 km लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू असून इगतपुरी ते 76 किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे.
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा नेमका कधी सुरू होणार याबाबत अजून तरी कोणतीहीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण लवकरच हा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.

असे असतानाच आता राज्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे महाराष्ट्राला आणखी एका महामार्गाची भेट मिळणार आहे. विशेष बाब अशी की हा महामार्ग समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांब राहणार आहे.
आम्ही ज्या एक्सप्रेस वे बाबत बोलत आहोत तो आहे इंदूर हैदराबाद महामार्ग. हा महामार्ग प्रकल्प महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, आज आपण या संपूर्ण प्रकल्पाची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार हा महामार्ग
इंदूर हैदराबाद महामार्ग समृद्धी महामार्गापेक्षा अधिक अंतराचा राहणार आहे. समृद्धी महामार्गाचे अंतर 701 किलोमीटर इतके असून इंदूर हैदराबाद महामार्गाचे अंतर 713 किलोमीटर इतके राहणार आहे. हा मार्ग तीन राज्यांना जोडणार आहे.
या एक्सप्रेस वे मुळे मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि तेलंगाना ही तीन महत्त्वाची राज्य एकमेकांना जोडली जाणार आहेत. हा एक्सप्रेस वे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित केला जाणार आहे.
भारतमाला परियोजने अंतर्गत केंद्र सरकार हा प्रकल्प पूर्ण करणार असून यासाठी तब्बल 15000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या महामार्गाचा रूट पाहिला असता या एक्सप्रेस वे ची सुरुवात इंदूरपासून होईल अन बाडवा आणि बुरहानपूरमार्गे इच्छापूरमधून आपल्या राज्यात येईल.
हा मार्ग आपल्या राज्यातील मुक्ताईनगर, जळगाव, अकोला, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांतून जाणार आहे. आपल्या राज्यातून मग पुढे हा महामार्ग तेलंगणात प्रवेश करून मंगलूर, रामसनपल्ली आणि संगारेड्डी मार्गे थेट हैदराबादपर्यंत असणार आहे.
सध्या इंदूर ते हैदराबाद हे अंतर 876 किलोमीटर इतके आहे. मात्र हा महामार्ग प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर हे अंतर 713 किलोमीटर पर्यंत कमी होणार आहे. या मार्गामुळे दोन्ही शहरांमधील अंतर तर कमी होणारच आहे शिवाय प्रवासाचा कालावधी देखील तीन तासांनी कमी होईल अशी आशा आहे.