Railway News : देशात आणि महाराष्ट्रात होळीचा मोठा सण नुकताच साजरा झाला आहे. राज्यात होळीचा आणि धुलीवंदनाचा सण मोठ्या थाटामाटात संपन्न झाला असून कोकणात शिमगोत्सवाची दरवर्षीप्रमाणे मोठी धूम पाहायला मिळाली. या उत्साहात सहभागी होण्यासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने अनेक विशेष गाड्या चालवल्या होत्या.
दरम्यान आता जे लोक गावी आले आहेत त्यांच्यासाठी देखील रेल्वे कडून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. आपल्या कर्मभूमीकडे परतताना नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हावी या अनुषंगाने रेल्वे कडून विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) दरम्यान आजपासून विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही विशेष गाडी 16 मार्च 2025 पासून सुरू होत असून या गाडीच्या मडगाव ते एलटीटी दरम्यान दोन आणि एलटीटी ते मडगाव दरम्यान दोन अशा चार फेऱ्या होतील.
दरम्यान आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असणार वेळापत्रक?
ही विशेष साप्ताहिक गाडी 16 आणि 23 मार्चला मडगावहून संध्याकाळी साडे चार वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 6 : 25 वाजता एलटीटी स्थानकात पोहोचेल.
परतीच्या प्रवासात, 17 आणि 24 मार्चला एलटीटीहून सकाळी 8:20 वाजता निघून त्याच रात्री 9:40 वाजता मडगाव स्थानकात पोहचणार आहे. ही गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक सोयीसुविधा देण्यासाठी या गाडीत 20 एलएचबी डबे असणार आहेत.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार ही गाडी?
प्रवासादरम्यान करमळी, थिवी, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आरवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा दिला जाणार आहे.
या विशेष गाडीच्या माध्यमातून गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर होणार असून, शिमगोत्सव साजरा करण्यासाठी गावी आलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.