Ahilyanagar Politics : आपल्या बेधकड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज राजकारण सोडून पुन्हा वैद्यकीय सेवेत येण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील गुरू पुण्यातील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. शैलेश पाटकर यांच्यासमोरच डॉ. विखे यांनी ही फटकेबाजी केली.
डॉ. विखे न्यूरोसर्जन आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षणाचे धडे डॉ. पाटकर यांनी दिले आहेत. अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात ही गुरूशिष्याची जोडी पाहुणे म्हणून एकाच व्यासपीठावर आली होती. डॉ. पाटकर यांनी डॉ. विखे यांचा आपला शिष्य असा उल्लेख केला.

तो धागा पकडून डॉ. विखे यांनी राजकीय संदर्भाने त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्याची संधी साधली. डॉ. विखे म्हणाले, डॉ. पाटकर यांनी मी त्यांचा विद्यार्थी असलेले अहिल्यानगरमध्ये येऊन सांगितले हे बरे झाले.
माझ्या वैदयकीय डिग्रीवर संशय घेऊन टीका करणाऱ्यांना आता उत्तर मिळाले असेल. मी खरोखरच न्यूरोसर्जन आहे याची आता विरोधकांची खात्री पटली असेल. सुरवातीच्या काळात वैद्यकीय सेवा करताना आपण रुग्णांना वास्तववादी सल्ले देत होतो.
मात्र, काही लोकांनी त्याचा उलटा अर्थ घेतला. पुढे मी वैद्यकीय व्यवसाय सोडून राजकारणात आलो. राजकारणातील डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करावी, असा यामागे उद्देश होता. त्यादृष्टीने सुरवात केली.
मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. या पराभवातून मी सावरलो आहे. आता पुन्हा वैद्यकीय व्यवसायात जाऊन लोकांची सेवा करण्याचा विचार करतो. राजकारण असो की वैद्यकीय व्यवसाय आपण जाहिरातबाजीत कमी पडलो. त्यामुळे उलटा प्रचार अधिक झाला.
मात्र, जाहिरातीपेक्षा कृतीला जास्त महत्व असते, येणाऱ्या काळात दिसून येईलच, असेही डॉ. विखे म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी डॉ. विखे यांच्या न्यूरोसर्जन असल्याबद्दल विरोधकांकडून शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्याला उत्तर देण्याची संधी आज त्यांनी साधली.
डॉ. पाटकर विखेंचे शिक्षक आहेत. त्यांनीच विखेंचा शिष्य असा उल्लेख केल्याची संधी विखेंनी साधली. शिवाय डॉ. पाटकर हेही आपल्यासारखेच जाहिरातबाजीपेक्षा कामाला महत्व देणारे असल्याचेही विखे म्हणाले.त्यामुळे आगामी काळात माजी खासदार सुजय विखे हे खरोखरच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होणार आहेत का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.