Maharashtra New Railway Line : महाराष्ट्रसहित देशभरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारित व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. जो भाग अजून रेल्वेने जोडला गेलेला नाही त्या भागात रेल्वे लाईन टाकल्या जात आहेत. नवनवीन रेल्वे स्टेशन विकसित होत आहेत.
अशातच आता राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की आगामी काळात पुणे ते मुंबई हा रेल्वे प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे.

पनवेल–कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाचे काम आगामी काळात पूर्ण होईल आणि त्यानंतर पुणे ते मुंबई हा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा आहे. सध्या या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून पुढील 9 महिन्यांत प्रकल्पाचे काम पूर्ण होईल अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून समोर येत आहे.
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3 म्हणजे एमयूटीपी-3 या प्रकल्पाअंतर्गत सदर रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत या रेल्वे मार्गाचे 70% इतके काम पूर्ण झाले असून उर्वरित 30 टक्क्यांचे काम अगदीच जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
मोहापे ते चिखलेदरम्यान रेल्वे रूळ मार्ग जोडण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत कर्जत ते चौकदरम्यानच्या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. सध्या या प्रकल्पांतर्गत मोठे आणि लहान पूल, उड्डाणपूल, पादचारी पूल आणि अतिरिक्त पूल यांची बांधकामे वेगाने सुरू आहेत.
मोहापे ते चिखलेदरम्यान जवळपास 8 किमी लांबीचा रेल्वेमार्ग तयार झाला असून, या मार्गावर ईयूआर रेकची वाहतूक सुद्धा सुरू आहे. या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यावर पुढील जोडणी कर्जत ते चौकदरम्यान सुरू होणार आहे.
पुणे एक्सप्रेस वेजवळील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर मोहापे आणि किरवली येथील प्रमुख चार उड्डाणपूल पूर्ण झाले आहेत. पनवेल-कर्जत मार्गावर एकूण पाच स्थानके उभारली जाणार असून, पनवेल, चौक, मोहापे, चिखले आणि कर्जत ही स्थानके असतील.
या स्थानकांच्या बांधणीचे कंत्राट देण्यात आले आहे. स्थानकांचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. यामुळे लवकरच हा रेल्वे मार्ग प्रकल्प पूर्ण होण्याची आशा व्यक्त होऊ लागली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे.