अहिल्यानगर : बऱ्याचदा अन्य वाहनाने हूल दिल्याने मोटारसायकलचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र काल याच्या अगदी उलट घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्वच वाहनचालकांचा कस लागणाऱ्या करंजी घाटामध्ये रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मालट्रक उलटल्याने दोन जण जखमी झाले.
सदर मालट्रक नगरकडून पाथर्डीकडे जात होता. हा ट्रक माणिकपीर बाबा दर्ग्याजवळ एका धोकादायक वळणाजवळ आला असता समोरून येणाऱ्या मोटारसायकलस्वाराने त्याला हुलकावणी दिल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातामध्ये मोटारसायकल स्वारासह ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातामध्ये ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले असून, दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. करंजी घाटातील धोकादायक वळणावर सातत्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने करंजी घाटाचे रुंदीकरण व धोकादायक वळणांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.